नवी दिल्ली : डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रातील ‘पेटीएम’ने प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीच्या माध्यमातून १६,६०० कोटी रुपये उभे करण्याच्या सादर केलेल्या प्रस्तावावर भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने शुक्रवारी मंजुरीची मोहोर उमटवली. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत कंपनी गुंतवणूकदारांना आजमावण्याची शक्यता आहे. 

समभाग सूचिबद्धतेच्या प्रक्रिया जलद गतीने पार पडावी यासाठी भागविक्रीपूर्व सुकाणू गुंतवणूकदारांना समभाग वितरणाच्या प्रक्रिया पेटीएमकडून टाळली जाईल, असे कयास केले जात आहेत. असे केल्याने कंपनीने अपेक्षिलेल्या मूल्यांकनात कोणताही फरक पडणार नसल्याचे कंपनीशी संलग्न उच्चपदस्थ सूत्रांनी विश्वास व्यक्त केला.

पेटीएमला या सार्वजनिक भागविक्रीच्या प्रक्रियेतून १.४७ लाख कोटी रुपये ते १.७८ लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन मिळण्याची अपेक्षा आहे. अमेरिकास्थित मूल्यांकनतज्ज्ञ अश्वाथ दामोदरन यांच्या मते, भागविक्रीपूर्व पेटीएमच्या प्रत्येक समभागाची किंमत ही २,९५० रुपयांच्या घरात जाणारी आहे. भागविक्रीसाठी निश्चित जाणारी किंमत ही याच्या आसपास राखली जाण्याचे कयास आहेत.