नवी दिल्ली : उच्च वाढक्षम समभागांसाठी शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण असल्याने पेटीएमच्या समभागात मागील काही काळापासून घसरण सुरू आहे, अशी स्पष्टोक्ती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी बुधवारी केली. पेटीएमची प्रवर्तक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स या कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी व्याज, कर, घसारा पश्चात उत्पन्नाच्या बाबतीत पुढील सहा तिमाहींमध्ये कंपनी नफाक्षम पातळीवर पोहोचणे अपेक्षित असल्याचा निर्वाळा दिला. भागधारकांना उद्देशून कंपनीने पाठविलेल्या पत्रात शर्मा यांनी कंपनीच्या व्यावसायिक वाढीची गती उत्साहवर्धक असल्याचा दावा केला.

प्राथमिक समभाग विक्रीच्या समयी निर्धारित किमतीच्या तुलनेत समभागाचा भाव सध्या खूप गडगडला आहे. उच्च वाढक्षम समभागांसाठी संपूर्ण जगभरातच अस्थिर बाजार स्थितीचा जबर दणका बसला आहे, पेटीएम हा एकमेव अपवाद नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.