scorecardresearch

पेटीएमचा समभाग गडगडला ; चिनी कंपन्यांना ‘डेटा’पुरविल्याच्या वदंतेचे बाजारात नकारात्मक पडसाद

रिझव्‍‌र्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला त्रयस्थ कंपनीमार्फत तिच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीचे समग्र परीक्षण करून घेण्याचेही आदेश दिले आहेत.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : पेटीएमची प्रवर्तक असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सच्या समभागांत सोमवारच्या व्यवहारात मोठी पडझड होऊन, तो तब्बल १३ टक्क्यांनी गडगडला. तांत्रिक प्रणालीत त्रुटी आढळल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर नवीन ग्राहक जोडण्यावर आणलेली बंदीचे नकारात्मक परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी या समभागाची मोठय़ा प्रमाणात विक्री केली.  

रिझव्‍‌र्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला त्रयस्थ कंपनीमार्फत तिच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीचे समग्र परीक्षण करून घेण्याचेही आदेश दिले आहेत. डिजिटल देयक व्यवहारातील अग्रणी कंपनी पेटीएमच्या व्यवहारांवर पेटीएम पेमेंट्स बँकेकडून प्रक्रिया केली जाते. नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदीच्या कारवाईमागील कारण म्हणजे बँकेने परदेशातील सव्‍‌र्हरवर डेटा प्रवाहित करण्याची परवानगी दिल्याचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा तऱ्हेने चिनी कंपन्यांना भारतातील ग्राहकांचे तपशील पुरविले गेल्याचीही बाजारात वदंता आहे. पेटीएमने मात्र हे सर्व आरोप ‘चुकीचे व अतिरंजित’ असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत.

मात्र या घटनाक्रमाचे समभाग मूल्यावर नकारात्मक परिणाम दिसून आले. सोमवारच्या व्यवहारात तो १३.२५ टक्के गडगडून ६७२.१० रुपयांवर स्थिरावला. १८,३०० कोटी रुपयांच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा समभाग विक्रीद्वारे नोव्हेंबरमध्ये पेटीएमचा (वन ९७ कम्युनिकेशन्स) समभाग सूचिबद्ध झाला. सूचिबद्धतेपासून रडत-खडत सुरुवात करणाऱ्या समभागाने २,१५० रुपये या खरेदी किमतीत आजवर तब्बल ७० टक्क्यांची झीज सोसली आहे. सोमवारच्या व्यवहारात त्याने सूचिबद्धतेनंतरचा नीचांकी तळ दाखविला.

पेटीएम पेमेंट्स बँकेवर २०१७ सालातील कार्यान्वयनापासून आजतागायत मध्यवर्ती बँकेकडून तीन वेगवेगळय़ा प्रसंगी दंडात्मक कारवाई केली गेली आहे. नवीन खाती उघडण्याला बंदी केली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेत पेटीएमचे संस्थापक-प्रवर्तक विजय शेखर शर्मा यांचा व्यक्तिश: ५१ टक्के भागभांडवली हिस्सा असून, उर्वरित ४९ टक्के भागभांडवली मालकी पेटीएमकडे आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Paytm shares tumble 13 percent after central bank crackdown zws

ताज्या बातम्या