नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफवर २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी ८.६५ टक्के व्याज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संबंधाने केंद्र सरकारने अखेर गुरुवारी अधिसूचना  काढली. याचा लाभ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ६ कोटींहून अधिक सदस्यांना होणार आहे.

संघटनेने २०१७-१८ मध्ये सदस्यांना वार्षिक ८.५५ टक्के व्याजदर दिला होता. तो वाढवून द्यावा, अशी मागणी कामगार खात्याने केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे केली होती. खात्याची ही प्रलंबित मागणी अखेर मान्य करून, त्यावर गुरुवारी काढल्या गेलेल्या अधिसूचनने शिक्कामोर्तब केले आहे. तीन वर्षांनंतर झालेली ही व्याजदर वाढ आहे.

संघटनेच्या व्याजदराबाबत निर्णय घेणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीतच वाढीव व्याजदराचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठविला होता.