फरार आर्थिक गुन्हेगारांना देशात परतण्याशिवाय पर्याय नाही – पंतप्रधान मोदी

सक्रियपणे पाठपुरावा सुरू ठेवत आतापर्यंत बँकांच्या कर्जबुडव्यांकडून ५ लाख कोटी रुपये वसूल केले गेले आहेत,

नवी दिल्ली : देशाबाहेर पळून गेलेल्या धनदांडग्या आर्थिक गुन्हेगारांचा माग घेऊन त्यांना परत आणण्यासाठी मुत्सद्दी पातळीवर प्रयत्नांसह सर्व पर्यायांचा वापर केला जात आहे आणि या मंडळींना देशात परतण्याशिवाय पर्यायच नाही, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.

येथे आयोजित एका परिसंवादासाठी जमलेल्या बँकांच्या प्रमुख व अधिकारी वर्गाला संबोधित करताना मोदी यांनी, संपत्ती निर्माते तसेच रोजगार-निर्मितीस हातभार लावणाऱ्यांना सक्रियपणे पाठबळ देण्याचे आणि त्यायोगे देशाचा ताळेबंद भक्कम करण्यासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले.

फरार आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याचा प्रयत्न म्हणून धोरणे आणि कायद्याच्या प्रक्रियेवर विसंबून राहण्याबरोबरच, राजनैतिक मध्यस्थी व मुत्सद्देगिरीचाही सरकारने वापर केला आहे. कोणाचाही नामोल्लेख अथवा संदर्भ न देता मोदी म्हणाले, ‘आमच्या प्रयत्नांनी दिलेला संदेश सुस्पष्टच आहे-तुमच्या देशात परत येण्याशिवाय तुमच्यापुढे पर्यायच नाही.’ अलीकडच्या काळात विजय मल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या कर्जबुडव्यांच्या प्रत्यापर्णासाठी भारताने सुरू केलेल्या प्रयत्नांच्या संदर्भात मोदी यांनी नाव न घेता वरील सूचक विधान केले.

सक्रियपणे पाठपुरावा सुरू ठेवत आतापर्यंत बँकांच्या कर्जबुडव्यांकडून ५ लाख कोटी रुपये वसूल केले गेले आहेत, तर अलीकडे स्थापित ‘राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी (एनएआरसीएल)’च्या माध्यमातून आणखी दोन लाख कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचे निवारण केले जाईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात म्हणजे २०१४ पासून बँकांना त्यांच्या समस्यांच्या निराकरणाचे मार्ग शोधता आले आहेत आणि बँकांचे आर्थिक स्वास्थ्य त्यामुळे तुलनेने खूप सुधारलेल्या स्थितीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

व्यवसायाच्या भरभराटीसाठी बँकांनाही आता भागीदारी प्रारूपाचा स्वीकार करावा लागेल आणि कर्ज ‘मंजूरकर्ते’ या भूमिकेत बाहेर पडून कर्जाचे ‘सुविधाकर्ते’ अशा कल्पनेचा अंगीकार त्यांना वेगाने करावा लागेल, असे मोदी यांनी सांगितले. व्यावसायिक, सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योजक (एमएसएमई) यांच्यासाठी अनुकूल आणि सोयीस्कर ठरेल अशा उपाययोजना त्यांनी तयार कराव्यात. या मंडळींना कर्ज मिळविण्यासाठी बँकांच्या शाखांचे खेटे घालावे लागण्याऐवजी, बँकांनी त्यांच्यापर्यंत आपणहून पोहचावे, अशी हाकही त्यांनी दिली. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm narendra modi message to fugitive economic offenders zws

Next Story
सुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध सुरू व्यापार
ताज्या बातम्या