पुणे : बँकेतर वित्तीय कंपनी – पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडने सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत १६३ कोटी रुपयांच्या आजवरच्या सर्वोच्च करोत्तर नफ्याची नोंद केली. वार्षिक स्तरावर नफ्यातील ही वाढ ७०.८ टक्क्यांची तर तिमाहीगणिक वाढ ही १५.८ टक्के इतकी आहे. गत शुक्रवारी कंपनीच्या संचालक मंडळाने ३० सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीसाठी हे आर्थिक निकाल जाहीर केले.

ग्राहक कर्जे आणि प्रामुख्याने सूक्ष्म व लघुउद्योगांना पतपुरवठय़ावर लक्ष केंद्रित करणाऱ्या पूनावाला फिनकॉर्पची व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता (एएयूएम) वार्षिक पातळीवर २२ टक्क्यांनी आणि तिमाही पातळीवर ५ टक्क्यांनी वाढून १८,५६० कोटी रुपयांवर गेली आहे. तर कर्ज वितरण वार्षिक पातळीवर ४४ टक्क्यांनी आणि तिमाही पातळीवर ८ टक्क्यांनी वाढून ३,७२१ कोटी रुपयांवर गेले आहे.

कंपनीच्या कामगिरीविषयी पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक सीए अभय भुतडा म्हणाले, दुसऱ्या तिमाहीदरम्यान व्यावसायिक वाढ, सुधारित पत दर्जा आणि नफा अशा सर्वच आघाडय़ांवर चांगली कामगिरी पाहायला मिळाली. या तिमाहीत आतापर्यंतचे सर्वाधिक वितरण, ग्राहक संपादन, गेल्या ३८ तिमाहींमधील सर्वात कमी बुडीत कर्जाचे प्रमाण (एनपीए), सर्वोच्च करोत्तर नफा आणि आरओए पाहायला मिळाला. यामुळे वर्षांच्या उर्वरित कालावधीतही चांगली कामगिरी राहण्याची आशा आहे.