मुंबई : महिला, पुरुष, मुले यांचे घरासाठीच्या नव्या व आधीपासून वापरात असलेल्या चीज-वस्तू अथवा कपाटात जतन करून ठेवलेले जुने कपडे यांचा व्यक्ती ते व्यक्ती पुनर्विक्रीचा अनोखा बाजारमंच ‘पॉशमार्क’ने भारतात प्रवेशाची बुधवारी पत्रकार परिषदेतून घोषणा केली. यातून भारतीय ग्राहक पॉशमार्कच्या जगद्व्यापी ८ कोटींहून अधिक वापरकत्र्या समुदायाचा भाग बनणार असून, विक्रीसाठी त्यापैकी लाखोंकडून त्यांच्या फडताळातून खुल्या केल्या गेलेल्या पसंतीची गोष्ट ते खरेदी करू शकणार आहेत.

काटकसर आणि मोठा भाऊ वा बहिणीने वापरलेले वस्तू-कपडे कुटुंबातील लहानग्यांकडून वापरात येण्याची संस्कृती असलेल्या देशातील हा प्रारंभ आपल्यासाठीही उत्सुकतेचा बनला आहे, असे पॉशमार्कचे संस्थापक व सीईओ मनीष चंद्रा यांनी सांगितले. उत्तर अमेरिकेत पुरते बस्तान बसविलेल्या पॉशमार्कने अमेरिकेबाहेर, मे २०१९ मध्ये कॅनडामध्ये सुरुवात करीत तेथे २५ लाख ग्राहक आणि ५० कोटी डॉलर मूल्याची उत्पादने सूचिबद्ध केली आहेत. तर फेब्रुवारी २०२१ पासून ऑस्ट्रेलियातही विस्तार साधला आहे. भविष्यात नवीन देश व उत्पादन वर्गांमध्ये विस्तार शक्य असल्याचे चंद्रा यांनी स्पष्ट केले.

संघटित, सुरक्षित, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि खऱ्या अर्थाने सामाजिक व्यासपीठाची अनुपस्थिती, ही भारतात पॉशमार्कसाठी मोठी संधी ठरते. भारतीय समाज कसे व काय विकत घेतो, विकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, अशी प्रतिक्रिया पॉशमार्क  इंडियाच्या महाव्यवस्थापक अनुराधा बालसुब्रमणियन यांनीही व्यक्त केली.