रिझव्‍‌र्ह बँकेने रुपयाच्या स्थिरतेसाठी वाणिज्य बँकांकडील रोखीला चाप लावणाऱ्या योजलेल्या उपाययोजनांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला विपरीत परिणाम भोगावे लागतील, असे कयास बांधत अनेक आघाडीच्या वित्तसंस्था व दलाल पेढय़ांनी देशाच्या विद्यमान आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचे अंदाज खालावत नेले आहेत.
विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षांत विकासदर खालावण्याचा धोका व्यक्त करणाऱ्या वित्तसंस्था व दलाल पेढय़ांमध्ये बहुतांश विदेशी गुंतवणूकदारांच्या निर्णयाला प्रभावित करणाऱ्या बहुराष्ट्रीय संस्थांचा भरणा अधिक आहे.
सरकारने संरक्षण क्षेत्र, दूरसंचार, विमा क्षेत्रात वाढीव विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मंगळवारी सायंकाळी निर्णय घेऊन सुकर केला. ही बाब स्वागतार्ह असली तरी या आर्थिक सुधारणा खूप उशिराने आल्या असून, देशात येऊ घातलेल्या विदेशी भांडवलाचा ओघ हा देशांतर्गत धोरणाऐवजी जगभरात आर्थिक आघाडीवर काय घडते यावरच अवलंबून राहावा अशा स्थितीला आपण येऊन पोहोचलो आहोत, असे बँक ऑफ अमेरिका मेरिल-लिंचने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. या संस्थेने आर्थिक विकासदराबाबत ५.८ टक्क्यांचा पूर्वी व्यक्त केलेला अंदाज कमी करीत ५.५ टक्क्यांवर आणला आहे.
कालच नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. माँटेकसिंग अहलुवालिया यांनीही रिझव्‍‌र्ह बँकेचे उपाय हे अत्यावश्यकच असले तरी त्याचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम मात्र क्लेशदायी असतील, असे मत व्यक्त केले आहे. अहलुवालिया यांनीही पूर्वी अंदाजलेला ६.५ टक्क्यांचा विकासदर मार्च २०१४ अखेर गाठता येणे कठीण असल्याचे प्रतिपादन केले, तर अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी मात्र चालू वर्षांत ६ टक्क्यांच्या विकासदराबाबत बहुतांश अर्थतज्ज्ञ व विश्लेषकांमध्ये एकमत दिसून येत असल्याचे काल जयपूर येथे बोलताना सांगितले.

मूल्यात्मक गुंतवणुकीची ही संधी म्हणता येईल काय?

गुंतवणूक करण्याची नेमकी वेळ कोणती अर्थात ‘टायिमग’ ही बाब नवख्या गुंतवणूकदारांसाठी किती महत्त्वाची हा एक वादाचा मुद्दा निश्चितच आहे. किंबहुना निर्देशांकाची पातळी पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेऊच नये, असा जाणकार सल्ला देतात. परंतु गुंतवणूक निर्णयासाठी किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) हा एक अनुभवसिद्ध निकष ठरला आहे. सोबतच्या आलेखात दिसते त्याप्रमाणे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ हा त्याच्या गेल्या १० वर्षांतील सरासरी पी/ई गुणोत्तराखाली वाटचाल करीत आहे. सेन्सेक्समध्ये समाविष्ट अनेक समभाग त्यांच्या वर्षांतील सर्वात खालच्या म्हणजे अर्थात खरेदीसाठी आकर्षक भावात उपलब्ध आहेत. म्हणूनच मूल्यात्मक गुंतवणुकीची ही एक सुसंधी आहे, असा एक अर्थ यातून निश्चितच ध्वनित होतो. पण याची एक दुसरी बाजूही आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे भाव हे त्यांचे आर्थिक हालहवाल आणि भविष्यातील नफाक्षमता व कामगिरीचे प्रतिबिंबच असते. भावभावनांना महत्त्व असलेल्या शेअर बाजारावर दीर्घकाळ या ना त्या कारणाने राहिलेल्या नकारात्मकतेच्या सावटापायी भाव खालावलेले असणे हे एक वेळ ठीक म्हणता येईल. परंतु नोव्हेंबर २०११ पासून आजवर सलग दीड वर्षे सेन्सेक्सचा पी/ई हा त्याच्या दशकभराच्या सरासरीपेक्षा खाली राहणे, म्हणजे गुंतवणूकदारांमध्ये सेन्सेक्समधील कंपन्यांची कामगिरी उंचावण्याची आशा राहिलेली नाही, असेही सूचित करणारे आहे. म्हणून  कंपन्यांच्या आर्थिक पाया ढळलेला नाही असे सुस्पष्ट संकेत मिळून, देशाच्या अर्थव्यवस्थेवर दाटलेले काळे ढगही जोवर दूर होत नाही, तोवर सध्या पडेल भावात उपलब्ध असलेल्या आघाडीच्या समभागातील गुंतवणूकही जरा जपूनच..!