वैयक्तिक निगेची आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या निर्मितीतील देशातील सर्वात मोठी कंपनी हिंदूस्तान युनिलिव्हरने नवीन वर्षांत सलग दुसऱ्या महिन्यात उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे, अशी माहिती बाजार विश्लेषक कंपनी एडेलवाईस सिक्युरिटीजने गुरुवारी अहवालाद्वारे दिली. कंपनीचे आंघोळीचे, धुण्याचे साबण तसेच टाल्कम पावडरसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढत्या महागाईमुळे उत्पादन घटकांच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. परिणामी उत्पादनाचा खर्च वाढल्याने कंपनीच्या उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ केली गेली आहे. गेल्या महिन्यात हिंदूस्तान युनिलिव्हरने साबण आणि कपडे धुण्याच्या पावडरच्या किमती वाढविल्या आहेत, त्यानंतर झालेली ही दुसरी किंमतवाढ आहे. वाढत्या महागाईचा वेग लक्षात घेऊन डिसेंबरअखेर कंपनीच्या व्यवस्थापनाने आगामी काळात किंमतवाढीचे सुस्पष्ट संकेत दिले होते.

ग्राहकांवर किंमतवाढ लादण्याआधी उत्पादनाशी संबंधित विविध प्रक्रिया आणि पद्धतींचा उच्चतम वापर करून खर्च कमी करण्याचा आणि अधिकाधिक बचत करण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. शिवाय निवडक गोष्टींच्या किमतीत बदल करून ग्राहकांवर किंमतवाढीचा पूर्ण ताण पडणार नाही, याची काळजी कंपनीकडून कायम घेण्यात येते, असे हिंदूस्तान युनिलिव्हरचे मुख्य वित्तीय अधिकारी रितेश तिवारी यांनी स्पष्ट केले.

एडेलवाईसने दिलेल्या माहितीनुसार, साबण, डिर्टजट पावडर, डिशवॉश आणि इतर वस्तूंच्या किमतीमध्ये फेब्रुवारीमध्ये ३ ते १० टक्क्यांची वाढ केली गेली आहे. यामध्ये सर्फ अ‍ॅक्सेल ईझी वॉश, सर्फ अ‍ॅक्सेल क्विकर वॉश, विम बार, लक्स, रेक्सोना साबण आणि पॉन्ड्स टाल्कम पावडरच्या किमतीत ही वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये देखील यातील काही वस्तूंच्या किमती ३ ते २० टक्क्यांनी वाढविण्यात आल्या होत्या.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price hike from hindustan unilever abn
First published on: 18-02-2022 at 03:09 IST