नवी दिल्ली : स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर बुधवारी आणखी ५० रुपयांनी महागला़  गेल्या वर्षभरात गॅस सिलिंडरमध्ये झालेली ही आठवी दरवाढ असून, या कालावधीत सिलिंडर २४४ रुपयांनी महाग झाला आह़े

आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशात बुधवारी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली़  त्यामुळे दिल्लीत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत १,०५३ रुपयांवर पोहोचली़ वर्षभरात गॅस सिलिंडरच्या किमतीत २४४ रुपयांनी वाढ झाली़ त्यापैकी १५३़ ३० रुपयांची वाढ मार्चपासून नोंदविण्यात आली आहे रशिया- युक्रेन युद्धानंतर गॅस सिलिंडर दरात झालेली ही चौथी वाढ आह़े  याआधी गॅस सिलिंडरमध्ये २२ मार्च आणि ७ मे रोजी प्रत्येकी ५० रुपये आणि १९ मे रोजी ३़ ५० रुपयांची दरवाढ झाली होती़

अनुदानित गॅस सिलिंडर केवळ उज्वला योजनेच्या लाभधारकांपुरता मर्यादित ठेवण्यात आला असून, उर्वरित ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर खरेदी करावा लागतो़  सिलिंडरची किंमत एक हजारपार झाल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले आह़े

सर्वसामान्यांवर महागाईचा बुलडोझर

गॅस सिलिंडर दरवाढीचा निर्णय जनताविरोधी आह़े भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा बुलडोझर चालवला आहे, अशी टीका काँग्रेसने केली़  महागाईविरोधात आज, गुरुवारपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचेही काँग्रेसने जाहीर केल़े