उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर वाढलेले नाहीत. मात्र, आता पुढील ११ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १२ रुपयांनी वाढ होऊ शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका अहवालात ही माहिती दिली आहे. तर कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल ११५ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या ताज्या अहवालानुसार, विक्रेत्यांना आंतरराष्ट्रीय बाजारातून चढ्या भावाने कच्चे तेल आयात करावे लागते. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलची विक्री करून तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तेल कंपन्यांना खर्च वसूल करण्यासाठी आणि तोटा भरून काढण्यासाठी १६ मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर १२ रुपयांनी वाढवणे आवश्यक आहे. तेल कंपन्यांचे नफा जोडल्यास प्रति लिटर १५.१ रुपयांची वाढ आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती गुरुवारी नऊ वर्षांत प्रथमच १२० डॉलर प्रति बॅरलच्या वर वाढल्या आणि शुक्रवारी १११ डॉलरवर किंचित कमी झाल्या. पण किंमत आणि किरकोळ दरांमधील अंतर वाढले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेल (पीपीएसी) कडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी भारतातील कच्च्या तेलाची खरेदी प्रति बॅरल ११७.३९ डॉलरपर्यंत वाढली, जी २०१२ नंतरची सर्वाधिक आहे. तर नोव्हेंबर २०२१ च्या सुरुवातीला कच्च्या तेलाची भारतीय बास्केट किंमत प्रति बॅरल सरासरी ८१.५ डॉलर होती.

तसेच ब्रोकरेज कंपनी जे.पी. मॉर्गन यांनी एका अहवालात म्हटले आहे की, राज्यातील विधानसभा निवडणुका पुढील आठवड्यात संपतील. त्यानंतर दररोज इंधनाचे दर वाढू शकतात, असा अंदाज आहे. अहवालानुसार, ३ मार्च २०२२ रोजी वाहन इंधनाचे विपणन नफा उणे ४.९२ रुपये प्रति लिटर इतके होते. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आतापर्यंत ते १.६१ रुपये प्रति लिटर आहे. इंधनाच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर, निव्वळ नफा १६ मार्च रोजी उणे १०.१ रुपये प्रति लिटर आणि १ एप्रिल रोजी १२.६ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली येऊ शकते.

देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. ४ नोव्हेंबर २०२१ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर कच्च्या तेलाच्या किमतीने मोठी झेप घेतली आहे.