काही दिवसांपूर्वी अनेक कंपन्यांनी रिलायन्स जिओ या कंपनीत १.५ लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल या कंपनीत एक प्रायव्हेट इक्विटी फर्म गुतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिल्व्हर लेक ही प्रायव्हेट इक्विटी फर्म रिलायन्स रिटेलमध्ये १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. रिलायन्स रिटेलचं एकूण मूल्य ५७ अब्ज डॉलर्स असल्याचं या प्रकरणाची माहिती ठेवणाऱ्या सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, कंपनी आपल्या १० टक्के शेअर्सची विक्री करण्यावर विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु सिल्व्हर लेक किंवा रिलायन्स यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. फायनॅन्शिअल टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अनेक क्षेत्रांमध्ये आपलं वर्चस्व असलेले मुकेश अंबनी आता रिटेल क्षेत्रातही आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी फ्युचर समुहाच्या रिटेल व्यवसायाची २४ हजार ७०० कोटी रुपयांना खरेदी केली होती. तसंच रिलायन्स जिओप्रमाणेच मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी ते जगातील मोठ्या गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याची तयारीही करत असल्याचं म्हटलं जात आहे.

यापूर्वी फेसबुकसोबतच अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली होती. रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणुकीच्या चर्चा असलेल्या सिल्व्हर लेक या कंपनीनंही रिलायन्स जिओमध्ये १० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. कंपनीनं दोन टप्प्यांमध्ये ही गुंतवणूक केली होती. पहिल्या टप्प्यात कंपनीनं ५ हजार ६५५ कोटी रूपयांची आणि त्यानंतर ४ हजार ५४६.८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

सिल्व्हर लेक ही एक अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे. तंत्रज्ञान आणि त्या संबंधित उद्योगांमध्ये ही कंपनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते. १९९९ मध्ये या कंपनीची स्थापना झाली असून आतापर्यंत जगातील मोठ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकदारांपैकी एक कंपनी असल्याचं म्हटलं जातं. सिल्व्हर लेकनं अलीबाब समूह, डेल टेक्नॉलॉजी, स्काईप आणि गो डॅडीसारख्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे.