पुणे : प्रतिकूल बाह्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किमतींत वाढ तसेच मालाचा पुरवठाही बाधित झाल्याने खर्चात वाढ होऊनही, रसायने व खतांच्या निर्मितीतील दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनने ३१ मार्च २०२२ अखेर तिमाहीत वेगवान कामगिरी नोंदविली.

कंपनीच्या महसुलात या तिमाहीत ४२ टक्क्यांची वाढ होऊन तो १,३५६ कोटी रुपयांवर पोहोचला, जो गतवर्षी याच तिमाहीत ९५५ कोटी रुपये होता. कंपनीच्या उत्पादनांतील आवश्यक घटक अमोनिया, फॉस अ‍ॅसिड, आरजीपी तसेच नैसर्गिक वायूच्या किमतीत या तिमाहीच्या काळात किमान ३९ टक्के ते कमाल १९२ टक्के अशी वाढ होऊनही, कंपनीचा महसूल तिमाहीत वाढल्याचे दीपक फर्टिलायझर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शैलेश सी. मेहता यांनी आवर्जून नमूद केले. बाजारपेठेत राबविण्यात आलेले धोरणात्मक उपक्रम आणि कंपनीच्या उत्पादनांना असलेली भक्कम मागणी या जोरावर हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यांतील दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण आर्थिक वर्षांत कंपनीच्या उत्पन्नाने ७,५०० कोटी रुपयांचा, तर निव्वळ नफ्याने १,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.