मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजाराची सप्ताहअखेर सकारात्मक सुरुवात झाली, मात्र अखेरच्या तासात झालेल्या विक्रीच्या माऱ्याने बाजारातील प्रमुख निर्देशांकांची दिवसाची अखेर मात्र नकारात्मक राहिली. परिणामी, सलग दोन सत्रांत दिसलेल्या वाढीला खंड पडून, सेन्सेक्समध्ये शुक्रवारी ४९ अंशांची किरकोळ घसरण झाली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४८.८८ अंशांच्या घसरणीच्या ५५,७६९.२३ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने सुमारे ६०० अंशांची झेप घेत ५६,४३२.६५ अंशांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता, तर ५५,७१९.३६ असा त्याने नीचांक गाठला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४३.७० अंशांची घसरण झाली आणि तो १६,५८४.३० पातळीवर स्थिरावला.

येत्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक होणार असून त्यामध्ये रेपो दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्या परिणामी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफावसुलीला प्राधान्य दिले. रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपोदरात २५ ते ३५ आधार बिंदूंची तर अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ केली जाण्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. मात्र व्याजदर वाढ आर्थिक वाढ आणि महागाईच्या दरावर अवलंबून आहे. जर मध्यवर्ती बँकांकडून आक्रमकपणे व्याजदर वाढ केली गेल्यास मंदीवाले भांडवली बाजाराचा ताबा घेतील, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. 

सेन्सेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, एनटीपीसी, बजाज फिनसव्‍‌र्ह, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि महिंद्राचे समभागात पिछाडीवर होते. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, सन फार्मा, विप्रो, टीसीएस आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे समभाग तेजीसह बंद झाले.