नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय संघटनांनी पाच दिवसांचा कामाचा आठवडा आणि निवृत्ती वेतनविषयक मागण्यांसाठी येत्या २७ जूनला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’च्या (यूएफबीयू) नेतृत्वाखाली ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (एआयबीओसी), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) यांच्यासह एकूण नऊ बँक कर्मचारी संघटनांच्या सदस्यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या जागी जुनीच निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मुख्य मागणी आहे, असे माहिती एआयबीईएचे सरचिटणीस सी एच वेंकटचलम यांनी ‘यूएफबीयू’च्या पदाधिकाऱ्यांची बैठकीनंतर सांगितले.

केंद्र सरकार आणि बँकांच्या व्यवस्थापनाने संघटनांच्या मागण्यांबाबत असंवेदनशीलता दाखविल्यास देशभरातील सुमारे सात लाख कामगार संपात सहभागी होतील, असे ‘एआयबीओसी’चे सरचिटणीस सौम्या दत्ता यांनी सांगितले.