नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षांपासून बुडीत कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांची आर्थिक स्थिती लक्षणीय सुधारली असून, चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते डिसेंबर या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेला तोटा झालेला नाही. उलट या कालावधीत बँकांनी ४८ हजार कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदविला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत दिली.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या परिस्थितीत सुधारणा होत असून सरकारने केलेल्या उपयोजनांमुळे बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होत असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर चालू आथिर्क वर्षांत बँकांची आर्थिक कामगिरी सुधारली असून बँकांनी ४८,८७४ कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्या वर्षी (२०२०-२१) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ३१,८२० कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली होती. मात्र २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत सलग पाच वर्षे सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांना तोटा झाल्याने एकूण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी निराशाजनक राहिली.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ८५,३७० कोटी रुपयांचा निव्वळ तोटय़ाची नोंद केली होती.तर २००९-१० ते २०१४-१५ या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नफा नोंदविला होता.
बँक शाखांच्या संख्येत वाढ
३१ मार्च २०१० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांची संख्या ५८,६५० शाखांवरून वाढून ८४,६९४ पर्यंत वाढली आहे.
आकडे पुरते बोलके
वर्ष नफा/ तोटा
२०२१-२२ ४८,८७४ नफा
२०२०-२१ ३१,८२० नफा
२०१९-२० २५,९४१ तोटा
२०१८-१९ ६६,६३६ तोटा
२०१७-१८ ८५,३७० तोटा
२०१६-१७ ११,३८९ तोटा (आकडे कोटी रुपये)