नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) ठेवींवरील व्याजदरात सोमवारी वाढ करीत असल्याची घोषणा केली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात १० ते २० आधार बिंदूंची वाढ केली आहे. नवीन व्याजदर १ जुलैपासून लागू झाले आहेत. रिझव्‍‌र्ह  बँकेने गेल्या महिन्यात रेपो दरात अध्र्या टक्क्यांची वाढ केल्यानंतर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांकडून कर्जाचे व्याज दर वाढण्याच्या परिणामाबरोबर बचत आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली जात आहे.याआधी स्टेट बँक. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेने देखील ठेवींवरील वदरात वाढ केली आहे. 

पंजाब नॅशनल बँकेने दोन कोटींहून कमी रकमेच्या विविध कालावधीच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. एक वर्ष ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या ठेवींच्या दरात १० आधार बिंदूंची वाढ झाली असून तो ५.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक आणि तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी व्याजदरात २० आधार बिंदूंची वाढ केली आहे. तो आता ५.५० टक्के करण्यात आला आहे. तर विविध कालावधीच्या दोन कोटींपेक्षा अधिक ठेवींवरील व्याजदर ‘जैसे थे’ठेवण्यात आले आहेत.

ज्येष्ठांना दिलासा

बँकेने ज्येष्ठ ठेवीदारांना आणि पंजाब नॅशनल बँकेच्या ६० वर्षांवरील निवृत्तिवेतनधारकांना ठेवींवर अतिरिक्त ०.५० टक्के व्याज देण्यात येणार आहे. ज्येष्ठ ठेवीदारांना ६ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.