मुंबई : अदानी समूहाने स्विस बहुराष्ट्रीय कंपनी ‘होल्सिम लिमिटेड’चा भारतातील व्यवसाय संपादण्यासाठी सुमारे ८१,००० कोटी रुपयांचा मोबदला मोजणारा करार केल्याचे नुकतेच जाहीर केले. त्यानुसार, होल्सिमच्या घटक असलेल्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडच्या भागधारकांकडून खुल्या बाजारातून समभागांची खरेदी करून, नियमानुसार दोन्ही कंपन्यांत प्रत्येकी २६ टक्के अतिरिक्त हिस्सेदारी मिळविणे अदानी समूहाला भाग ठरणार आहे. त्यासाठी पुढील महिन्यात ६ जुलैपासून या कंपन्यांच्या सामान्य भागधारकांकडून खरेदीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर करण्यात आला. 

अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडच्या भागधारकांसाठी ही ‘ओपन ऑफर’१९ जुलैपर्यंत (भरणा पूर्ण होईपर्यंत) खुली राहील. अदानी समूहाकडून खुल्या बाजारातून अंबुजा सिमेंटचे समभाग प्रत्येकी ३८५ रुपयांना, तर एसीसी लिमिटेडचे समभाग प्रत्येकी २,३०० रुपयांना खरेदी करण्यात येणार आहेत. ही भांडवली बाजाराच्या इतिहासातील ३१,१३९ कोटी रुपयांची म्हणजेच ४ अब्ज डॉलरची आतापर्यँतची सर्वात मोठी ‘ओपन ऑफर’ ठरण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारातून समभाग खरेदीनंतर अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८९ टक्के आणि एसीसी लिमिटेडमधील हिस्सेदारी ८१ टक्क्यांवर पोहोचणार आहे.