रिझव्‍‌र्ह बँकेतून बाहेर पडण्यासाठी भाजप नेते सुब्रह्मण्यन स्वामी यांच्याकडून आग्रह धरला जात असताना, आपल्याला दुसऱ्यांदाही गव्हर्नरपद भूषविण्याची संधी मिळाल्यास आवडेल, असे उत्तर डॉ. रघुराम राजन यांनी शुक्रवारी येथे दिले.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांना आता पुन्हा प्राध्यापक म्हणून शिकागो (बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये) येथे पाठविण्याची गरज प्रतिपादन केली होती. त्यांच्या व्याजदर वाढीच्या पतधोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली, उद्योगांच्या हलाखीत व बेरोजगारीतही भर पडल्यायाचा आरोपही स्वामी यांनी केला होता.
गेल्या काही दिवसांपासून लंडन दौऱ्यावर असलेल्या राजन यांना स्वामी यांच्या ‘इच्छे’बाबत विचारले असता, गव्हर्नर म्हणून मी माझ्या कामाचा प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवत असून मला अजून खूप काही करायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी आपल्याला पुन्हा संधी मिळाली तर ते कार्य तडीस नेता येईल, असेही ते म्हणाले.
महागाई नियंत्रण आणि अधिक विकासाकरिता रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीही अनेक उपाययोजना केल्याचे नमूद करत राजन यांनी अर्थव्यवस्थेतील वातावरण अधिक सकारात्मक करण्यासाठी आपण आग्रही आहोत व याकरिता पुन्हा संधी मिळाली तर त्याचा आपण निश्चितच विनियोग करू, असे सांगितले.
इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने, मुदतवाढ न मिळाल्यास गव्हर्नरपदाचे कार्य अर्धवट राहते का, या प्रश्नाच्या उत्तरात राजन यांनी केवळ ‘हा एक चांगला प्रश्न होता’ अशा शब्दांत सूचकता दर्शविली.
राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत येत्या सप्टेंबरमध्ये संपत आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली. राजन यांच्या पदावरून यापूर्वी केंद्रातील अर्थमंत्र्यांसह काहींनीही आक्षेप घेतला होता. त्यानंतर खुद्द पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करत राजन यांना निश्चिंत राहण्याचा सल्ला दिला होता.
राजन यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून पद भूषविले आहे. शिकागो विद्यापीठाच्या ‘बूथ स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये त्यांनी वित्त या विषयाचे अध्यापनही केले आहे.

‘लेहमन’ संकटाची स्थिती येणार नाही..
देशातील बँका वाढत्या बुडीत कर्जातून निश्चितच बाहेर पडतील, असा विश्वास व्यक्त करताना अमेरिकेसारखे लेहमन ब्रदर्सच्या रूपातील आर्थिक संकट भारतावर ओढवणार नाही, असे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.
वाढत्या महागाईची चिंता आहेच!
देशात वाढत्या महागाईची चिंता कायम आहे; त्यामुळे लगेचच व्याजदर कपात करण्याच्या आशेला बाधा येऊ शकते, असे स्थिर व्याजदराचे संकेत गव्हर्नरांनी दिले. महागाईची सध्याची स्थिती ही रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशीलतेपल्याड असल्याचे मत व्यक्त करत अधिक विकासदराबाबत मात्र राजन यांनी आशावाद व्यक्त केला.