scorecardresearch

ग्रामीण सहकारी बँकांना भांडवल उभारणीचे अतिरिक्त मार्ग; समभाग, रोख्यांची प्राधान्याने विक्रीद्वारे भांडवल उभारण्यास परवानगी

ग्रामीण सहकारी बँकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सभासदांकडून म्हणजेच विद्यमान भागधारकांकडून विविध साधनांद्वारे निधी उभारण्यास भागभांडवलात विस्ताराच्या अतिरिक्त पर्यायांना रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी परवानगी दिली.

मुंबई:  ग्रामीण सहकारी बँकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सभासदांकडून म्हणजेच विद्यमान भागधारकांकडून विविध साधनांद्वारे निधी उभारण्यास भागभांडवलात विस्ताराच्या अतिरिक्त पर्यायांना रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी परवानगी दिली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, ग्रामीण सहकारी बँका, ज्यामध्ये राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश होतो, या आता समभाग आणि रोख्यांची निवडक भागधारकांना प्राधान्यतेने विक्री करून भांडवल उभारणी करू शकतील. ग्रामीण सहकारी बँक तिच्या कार्यक्षेत्रातील सभासद किंवा विद्यमान भागधारकांना कायमस्वरूपी बिगरसंचयी (पर्पेच्युअल नॉन-क्युम्युलेटिव्ह) प्राधान्यतेने समभागांच्या विक्रीच्या माध्यमातून भांडवल उभारणी करू शकणार आहेत. जे प्रथम श्रेणी भांडवलामध्ये समाविष्ट करण्यास त्या पात्र असतील. याशिवाय, टियर-२ प्रकारच्या भांडवलासाठी कायमस्वरूपी बिगरसंचयी (पर्पेच्युअल नॉन-क्युम्युलेटिव्ह) प्राधान्यतेने समभाग, विमोचनयोग्य बिगरसंचयी प्राधान्यतेने (रिडीमेबल नॉन-क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स) समभाग आणि विमोचनयोग्य संचयी समभागांच्या माध्यमातून निधी उभारणी केली जाऊ शकते.

टियर १ प्रकारच्या भांडवलामध्ये समावेशासाठी प्राधान्यतेने कर्ज रोखे आणि टियर २ भांडवलामध्ये समावेश करण्यास दीर्घकालीन गौण रोख्यांच्या (सबऑर्डिनेट डेट ) माध्यमातूनदेखील या बँका निधी उभारू शकतील. समभाग, रोख्यांची प्राधान्याने विक्रीद्वारे भांडवल उभारणीसाठी ग्रामीण सहकारी बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. बँकांना मुदत ठेवींचा दर हा या निधी उभारणीसाठी मानदंड म्हणून वापरता येणार नसून ज्या साधनांद्वारे निधी उभारला जाणार आहे त्या बँकेच्या मुदत ठेवी नाहीत, याबाबत ठळकपणे उल्लेख करणे आवश्यक आहे. याचबरोबर सभासदांना या दरम्यान मृत्यू झाल्यास, रोखे अथवा समभागांचे कायदेशीर वारसांना हस्तांतरणाची प्रक्रियादेखील निर्दिष्ट करण्यास सांगण्यात आल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raising capital cooperative banks permission raise capital preference sale shares bonds ysh

ताज्या बातम्या