निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचे अनुमान 

खरिपाच्या हंगामातील विक्रमी उत्पादन आणि रब्बीसाठी उंचावलेला अंदाज पाहता, चालू आर्थिक वर्षात सार्वत्रिक अपेक्षांच्या तुलनेत सरस म्हणजे १० टक्क्यांपेक्षा अधिक दराने अर्थव्यवस्था विकास पावताना दिसू शकेल, असे आश्वासक अनुमान निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी येथे व्यक्त केला.

जागतिक अर्थव्यवस्थेत शाश्वात फेरउभारीच्या अंगाने महागाईचा जगभरातील वाढता भडका, पुरवठा शृखंलेतील अडसर आणि इंधनाच्या किमतीतील वाढ ही मोठी जोखीमदेखील दिसून येते, असे कुमार यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

निती आयोगाच्या ‘अर्थनीती’ नावाच्या नियतकालिक वार्तापत्रात लिहिलेल्या लेखात राजीव कुमार यांनी चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर १० टक्क्यांपुढची मजल गाठू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. ‘विक्रमी खरिपाचे पीक आणि रब्बी उत्पादनाच्या उज्ज्वल शक्यता पाहता, ग्रामीण भागातील मागणीला चालना मिळेल. परिणामी उद्योग क्षेत्राच्या क्षमता वापरात सुधारणा होऊन, निर्मिती क्षेत्राचे पुनरुज्जीवनही सुकर झालेले दिसेल,’ असे त्यांनी नमूद केले.

राजीव यांच्या मते, निर्यातीतील लक्षणीय वाढीच्या शक्यता पाहता, अर्थवृद्धीला आणखी बळ मिळेल आणि रोजगाराच्या संधीही त्यामुळे वाढतील. सेवा उद्योगातील संपर्कप्रवण क्षेत्रही (पर्यटन, आतिथ्य, प्रवास वगैरे) हळूहळू जोम धरेल, जे एकूण विकासवाढीला हातभार लावणारे ठरेल. २१ ऑक्टोबरला भारताने साध्य केलेला १०० कोटी लसीकरणाच्या सफलतेचा महत्त्वपूर्ण टप्पा हा या कामी उत्साहदायी ठरला असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. लसीकरणाची देशभरात तीव्रतेने सुरू राहिलेल्या मोहिमेने भविष्यात रुग्णवाढीच्या लाटांची शक्यता धूसर बनविली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

रिझर्व्ह बँकेने आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफनेही ९.५ टक्के दराने २०२१ सालात भारतीय अर्थव्यवस्थेने वाढ नोंदविणे शक्य असल्याचे अनुमान यापूर्वीच नोंदविले आहे.