देशाच्या अर्थवृद्धीविषयी पतमानांकन संस्था ‘ब्रिकवर्क’चे अनुमान

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवान विकासाचे म्हणजे १० ते १०.५ टक्के दराने वाढीचे आशावादी अनुमान पतमानांकन संस्था ब्रिकवर्कने मंगळवारी व्यक्त केला. करोना काळादरम्यान केलेल्या आर्थिक सुधारणा आणि अपेक्षेपेक्षा सरस वेगाने झालेल्या लसीकरणाने आर्थिक चक्र वेगाने फिरू लागल्याचा हा सुपरिणाम आहे.

ब्रिकवर्कच्या मते, अर्थव्यवस्थेतील विविध घटक अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने पूर्वपदावर आले आहेत. तसेच नवीन करोना रुग्णसंख्येमध्ये घट झाल्यामुळे आर्थिक वर्ष २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ८.३ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. पुढेही सातत्यपूर्ण सुधारणेची शक्यता असून जीडीपीमध्ये आणखी वाढीची आशा आहे. बहुतेक राज्यांनी आधीच सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या लसीकरणामुळे आर्थिक सक्रियता तीव्रतेने वाढण्याची शक्यता आहे.

करोना संसर्गाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. हॉटेल, पर्यटन आणि वाहतूक यांसारखी संपर्क केंद्रित क्षेत्रे आणि पुरवठ्यातील व्यत्यय पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो. अर्थव्यवस्था हळूहळू सामान्य स्थितीत परतत आहे. हे निर्मिती क्षेत्र आणि सेवा क्षेत्रांसंबंधी अलीकडे आलेल्या समाधानकारक आकडेवारीवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शिवाय सणोत्सवाच्या काळात ग्राहकांच्या मागणी देखील वाढली आहे, असे निरीक्षण पतमानांकन संस्थेने नोंदविले आहे. 

वृद्धीसाठी अडसर ठरू शकणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका सध्या तरी लसीकरणामुळे कमी झाला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती, धातू, खनिज उत्पादने, उत्पादन घटकांच्या वाढत्या किमती, मर्यादित कोळसा पुरवठा आणि वाढते मालवाहतुकीचे दर यामुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे, असे ब्रिकवर्कने म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून अलीकडच्या काही महिन्यांमध्ये भांडवली खर्चात वाढ झाली आहे, ज्याचा सुपरिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या हंगामात वाढलेल्या वस्तू आणि सेवांच्या मागणीमुळे मागणीच्या स्थितीत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत वाढलेल्या क्षमतेच्या अधिक कार्यक्षम वापर होईल.