वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सुधारित अंदाज वर्तविताना तो ८.२ टक्क्यांपर्यंत खालावत आणला आहे. त्यामध्ये ०.८० टक्कयांची कपात केली आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे एकूण जागतिक उपभोगात बदल होण्याची शक्यता असून वाढत्या महागाई परिणामाच्या चिंतेतून हे सुधारित अंदाज आले आहेत.

मंगळवारी नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनाच्या ताज्या अद्ययावत अहवालात हे सुधारित अंदाज वर्तविण्यात आले आहेत.  वॉशिंग्टनस्थित या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने देशांतर्गत घटती मागणी आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे खाजगी क्षेत्राकडून होणारा उपभोग आणि गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त आहे. यातूनच एकूण निर्यात कमी होण्याची भीती व्यक्त केली आहे.

चालू आर्थिक वर्षांसाठी नाणेनिधीचा हा सुधारित अंदाज रिझव्‍‌र्ह  बँकेच्या ७.२ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. याचबरोबर आगामी आर्थिक वर्षांसाठी (२०२३-२४) नाणेनिधीने आणि रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केलेल्या अदांजात मोठी तफावत आहे. नाणेनिधीच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ६.९ टक्के राहील तर रिझव्‍‌र्ह बँकेचे तो ६.३ टक्क्यांवर राहण्याचे अनुमान आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वर्तविलेला ७.१ टक्क्यांचा अंदाजही, भारतात पतपुरवठय़ातील संभाव्य वाढ आणि त्या परिणामी खासगी क्षेत्रातून गुंतवणूक आणि उपभोगात अपेक्षित सुधारणा, वित्तीय क्षेत्राच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीवर आधारित असल्याचे नाणेनिधीने स्पष्ट केले. जागतिक बँकेने देखील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा अंदाज ८ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.