मुंबई : नावाजलेली लेखापाल पेढी ‘हरिभक्ती अँड कंपनी एलएलपी’ला पुढील दोन वर्षांसाठी नियमन असलेल्या कोणत्याही संस्थेसाठी लेखापरीक्षण करण्यास बंदी घालणारा आदेश रिझव्र्ह बँकेने मंगळवारी दिला. या बंदी आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून लागू होईल, जेणेकरून चालू आर्थिक वर्षांत तिने हाती घेतलेल्या लेखापरीक्षणाच्या कामांवर कोणताही परिणाम होणार नाही.
एका महत्त्वाच्या बँकेतर वित्तीय कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षणाच्या संदर्भात मध्यवर्ती बँकेकडून जारी दिशानिर्देशांचे पालन करण्यात हयगय केल्याच्या कारणाने ही बंदीची कारवाई केली असल्याचे रिझव्र्ह बँकेने प्रसिद्धी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. रिझव्र्ह बँक कायदा, १९३४ च्या ‘कलम ४५ एमएए’च्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. कायद्याच्या या कलमाच्या तरतुदींनुसार लागू करण्यात आलेली ही पहिलीच बंदी आहे. बँकिंग क्षेत्राची नियंत्रक असलेल्या रिझव्र्ह बँकेकडून कोणत्याही लेखा परीक्षकावर दोन वर्षांच्या बंदीच्या कारवाईचा हा पहिलाच प्रसंग आहे. २०१९ मध्ये अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या जागतिक लेखा संस्थेची सहयोगी एसआर बाटलीबॉय अँड कंपनीवर रिझव्र्ह बँकेने एक वर्षांची बंदी आणली होती.