रिझव्‍‌र्ह बँकेची घाऊक कारवाई;
महाराष्ट्रातील १४ कंपन्यांचा समावेश

बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेडसह एकदम ५६ बिगरबँकिंग वित्त कंपन्यांची नोंदणी रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी रद्द केली. कारवाईचे कारण स्पष्ट नसलेल्या या कंपन्यांमध्ये महाराष्ट्रातील १४ बिगरबँकिंग वित्त कंपन्यांचा समावेश आहे.
५६ बिगरबँकिंग वित्त कंपन्यांची नोंदणी असलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने शुकवारी उशिरा संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक टाकून जाहीर केले. भारतीय रिझव्‍‌र्ह बँक कायदा, १९३४ च्या कल ४५-आयए (६) अन्वये हे पाऊल उचलण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नोंदणी रद्द करण्यात आलेल्या बिगरबँकिंग वित्त कंपन्यांमध्ये सर्वाधिक, १६ या कोलकत्यातील आहेत. तर महाराष्ट्रातील १४ पैकी दोन पुण्याच्या व दोन नवी मुंबईतील बिगरबँकिंग वित्त कंपन्या आहेत.
पुणेस्थित बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेडची नोंदणी ३० ऑक्टोबर २००९ रोजीची आहे. तर अनेक कंपन्यांची नोंदणी ही १९९८ मधील आहे. बजाज फायनान्स, बजाज अलायन्झ लाइफ व बजाज अलायन्झ जनरल यांची धारक कंपनी असलेल्या बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिडेटने तिची बजाज फायनान्स या क्षेत्रात असल्याने बिगरबँकिंग वित्त कंपनी म्हणून परवाना मागे घेण्याचे यापूर्वीच सूचित केले होते.
मुंबईतील आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, फ्युचर व्हेंचर्स इंडिया लिमिटेड या कंपन्यांचाही समावेश नोंदणी रद्द केलेल्या कंपन्यांमध्ये आहे.
बिगरबँकिंग वित्त कंपन्यांबाबतची नवी मार्गदर्शक तत्त्वे सादर करताना रिझव्‍‌र्ह बँकेने नोव्हेंबर २०१४ पासून याबाबतचे नियम अधिक कठोर केले आहेत.