रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला. रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०१८ आणि ३१ मार्च २०१९ या दोन वर्षांच्या बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात तपासणी केली. त्यामध्ये जोखीम मूल्यमापन अहवाल, तपासणी अहवाल आणि सर्व संबंधित पत्रव्यवहाराच्या केलेल्या तपासणीत बँकेने कर्जदार कंपन्यांच्या भाग भांडवलाच्या तीस टक्क्यांपेक्षा अधिक समभाग गहाणखत ठेवण्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

नियम पालनातील कुचराईमुळे ही कारवाई करण्यात आली असून, स्टेट बँकेच्या ग्राहकांसोबतच्या व्यवहारावर त्यातून कोणताही परिणाम करण्याचा हेतू नाही, अशी स्पष्टोक्तीही मध्यवर्ती बँकेने निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेकडून कारणे दाखवा नोटीस बँकेवर बजावण्यात आली होती.  मात्र बँकेने केलेले नियम उल्लंघन गंभीर स्वरूपाचे असल्याचा रिझर्व्ह बँकेचा निष्कर्ष आहे.