देशात सध्या करोनानं थैमान घातलं आहे. आर्थिक स्थितीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांकडून तीन महिने ईएमआय न घेण्याच्या सुचना बँकांना केल्या होत्या. त्यानंतर बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय स्थगित करून ईएमआयच्या कालावधीत तीन महिन्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही करोनाचं संकट सुरूच असल्यानं तसंच लॉकडाउनचा कालावधीही वाढल्यानं पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी हा दिलासा देता येईल का यावर रिझर्व्ह बँक विचार करत आहे. इंडियन बँक असोसिएशनकडून ईएमआय मोरेटोरिअमला पुढे वाढवण्यासाठी अनेक सुचना मिळाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच रिझर्व्ह बँक यावर विचारही करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

शनिवारी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केली. तसंच रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही सुटही दिली आहे. लॉकडाउन सुरू राहणार असल्यानं अर्थचक्र पुन्हा सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ईएमआयबाबत देण्यात आलेला तीन महिन्यांचा कालावधी ३१ मे रोजी पूर्ण होणार आहे. काही कंपन्या किंवा व्यक्तींना सद्य परिस्थितीत ईएमआयची रक्कम फेडण्यात समस्या होऊ शकतात. त्यामुळे मोरेटोरिअमला आणखी तीन महिने वाढवण्याचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्ज घेणाऱ्यांना आणि बँकांना या संकटकाळात यामुळे मदत मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. फॉयनॅन्शिअल एक्सप्रेसनं पीटीआयच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं २७ मार्च रोजी सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना १ मार्च २०२० पासून सर्व कर्जदारांच्या ईएमआय भरण्यावर ३ महिन्यांचा मोरेटोरिअम उपलब्ध करण्यास सांगितलं होतं. ग्राहकांना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे ईएमआय होल्ड करण्याची सुविधा देण्यात आली होती. परंतु या तीन महिन्यांचा कालावधीदरम्यान व्याज मात्र लागणार होतं, जे नंतर ग्राहकांना अतिरिक्त ईएमआयच्या स्वरूपात द्यावं लागणार आहे. तसंच ज्यांना या पर्यायाची आवश्यकता होती त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नसल्याचं बँकांनी सांगितलं होतं.