मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेकडून आगामी काळात व्याजदरात ५० आधार बिंदूची (अर्धा टक्के) वाढ केली जाण्याची शक्यता आहे. जूनमधील नियोजित द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीत पाव टक्क्याची तर त्यापुढील ऑगस्टमध्येदेखील पाव टक्क्यांची वाढ केली जाण्याची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘इकोरॅप’ अहवालाने केले आहे.

नवीन आर्थिक वर्षांतील पहिले द्विमासिक पतधोरण चालू महिन्यात ८ एप्रिलला जाहीर करताना, रिझव्‍‌र्ह बँकेने सार्वत्रिक अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कोणताही बदल केला नाही. बँकेकडून सलग ११ व्या बैठकीत व्याजदर जैसे थे राखण्यात आले. मात्र व्याजदरात यथास्थिती कायम ठेवली असली तरी, प्राधान्यक्रमाने विकासाकडून महागाई नियंत्रणाकडे वळण घेतल्याचे स्पष्ट संकेत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी त्या वेळी दिले. त्यामुळे जूनपासून रेपो दरात किमान अर्धा टक्क्याच्या वाढीची अपेक्षा स्टेट बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

चलनवाढीच्या आघाडीवर, ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारीत किरकोळ महागाई दर सरलेल्या मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या कडाडलेल्या किमती आणि त्यात आभाळाला पोहोचलेल्या इंधनदराची भर पडून, किरकोळ महागाई दराने मार्चमध्ये १७ महिन्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे. चालू वर्षांत सप्टेंबपर्यंत महागाई दर सात टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरनंतर तो ६.५ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर चालू आर्थिक वर्षांत वस्तू आणि सेवांच्या किंमतवाढीचा अंदाज घेता महागाई दर ६.५ टक्क्यांच्या पातळीवर राहण्याची आशा आहे, असे अहवालात म्हटले आहे.

व्याजदर वाढीच्या शक्यतेने रोख्यांवरील परताव्यातदेखील वाढ होण्यास सुरुवात झाली असून सप्टेंबर अखेपर्यंत सरकारी रोख्यांवरील परतावा ७.७५ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणात्मक उपायांच्या माध्यमातून रोख्यांवरील परतावा दर ७.७५ टक्क्यांच्या पातळीवर मर्यादित राखला जाईल, असे ‘इकोरॅप’ अहवालाने नमूद केले आहे.