सर्वसामान्यांना गृह कर्ज, वाहन कर्जावरील व्याजाचे दर तूर्त वाढणार नाहीत हा दिलासा, परंतु त्यात कपातीसाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागेल, असे सूचित करणारे पतधोरण मंगळवारी रिझव्र्ह बँकेने सादर केली. अपेक्षेप्रमाणे पाऊस चांगला होऊन, अन्नधान्य वितरणाचे व्यवस्थापन नीट झाल्यास महागाईचा चढू पाहणारा पारा येत्या महिन्यांमध्ये स्थिरावणे आवश्यक असल्याचा इशाराही या निमित्ताने गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला. सार्वत्रिक अपेक्षा केली जात होती त्याप्रमाणे रिझव्र्ह बँकेने आपले प्रमुख धोरण दर आहे त्या पातळीवर कायम ठेवत असल्याचे, मंगळवारच्या द्विमासिक आढावा बैठकीनंतर स्पष्ट केले. त्यानुसार बँक दर ७ टक्के, रेपो दर ६.५ टक्के, रिव्हर्स रेपो दर ६ टक्के, रोख राखीवता प्रमाण (सीआरआर) ४ टक्के आणि वैधानिक तरलता प्रमाण (एसएलआर) २१.२५ टक्के या विद्यमान पातळ्यांवर कायम राखण्यात आले आहेत. यापूर्वी रिझव्र्ह बँकेकडून करण्यात आलेल्या कपातीचे प्रत्यक्ष कर्जदार ग्राहकांना दिलासा देणारे संक्रमण पुरते घडले नसल्याच्या कानपिचक्याही गव्हर्नर राजन यांनी बँकांना पुन्हा एकदा दिल्या. महागाई दरात वाढीच्या शक्यतेचे पारडे जड असल्याचे रिझव्र्ह बँकेने म्हटले असले तरी, जानेवारी २०१७ साठी निर्धारित केलेले ५ टक्के महागाई दराचे लक्ष्य कायम राखणे. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षांसाठी सकल राष्ट्रीय उत्पादनांत ७.६ टक्के दराने वाढ होईल, हा पूर्वअंदाजही न बदलणे, हेही या ‘जैसे थे’ पतधोरणाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अन्नधान्य किंमतवाढ आणि खनिज तेलासह आयातीत जिनसांच्या किमतीतील वाढीने एकंदर महागाई दराबाबत अनिश्चिततेची स्थिती निर्माण केली असल्याने, व्याजाचे दर आहे त्या स्थितीत राखावे लागत आहेत. तरी नजीकच्या काळात व्याजराबाबत बदलत्या परिस्थितीनुरूप उदारतेला वाव आहे, असे नमूद करीत गव्हर्नर राजन यांनी पुढच्या काळात व्याजदर कपात शक्य असल्याचेही संकेत दिले. फेरनियुक्तीची उत्कंठा कायम मुंबई : रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी येत्या सप्टेंबरनंतर ‘मला मुदतवाढ मिळेल की नाही याबाबत सुरू असलेल्या अटकळींना ताबडतोबीने पूर्णविराम देऊन त्यातील मजा घालवून देण्याची ‘क्रूरता’ मी करू इच्छित नाही,’ असे म्हणत या निर्णयाबाबतची उत्कंठा कायम ठेवणारे निवेदन रघुराम राजन यांनी मंगळवारी केले. पत्रकार परिषदेत हा प्रश्न येणार हे गृहीत धरून त्यासंबंधी एक लेखी निवेदनाची तयारी आपण करून ठेवली होती, असे नमूद करीत त्यांनी ते निवेदन वाचून दाखविले. हा निर्णय पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी विद्यमान गव्हर्नरांशी सल्लामसलतीतूनच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या ३ सप्टेंबरला राजन यांचा रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियोजित तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. ‘पेमेंट बँक माघारी बेचैन करणारी नाही’ मुंबई : काही कंपन्यांकडून नव्या धाटणीची पेमेंट बँक स्थापनेबाबत माघार घेऊन परवाने परत करण्याच्या भूमिकेने रिझव्र्ह बँकेने बेचैन व्हावी, अशी स्थिती नसल्याचे रघुराम राजन यांनी स्पष्ट केले. काही मंडळींनी विश्लेषणाअंती पुढे पाऊल न टाकण्याचा निर्णय घेऊन माघार घेतली आहे. यातून रिझव्र्ह बँकेने परवाने वितरण करताना, पुरेशी उदारता आणि अधिकाधिक इच्छुकांना सामावून घेण्याचे धोरण अनुसरले ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले. रिझव्र्ह बँकेने तत्त्वत: मंजुरी दिलेल्या ११ पेमेंट बँक परवान्यांपैकी, आजवर तीन कंपन्यांनी स्थापनेआधीच माघार कळविली आहे. यात टेक महिंद्र, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट आणि दिलीप संघवी, आयडीएफसी बँक आणि टेलीनॉर फायनान्शियल सव्र्हिसेस या तीन भागीदारांच्या एकत्रित अर्जाचा समावेश आहे. एप्रिलमधील पतधोरणाच्या घोषणेनंतर प्राप्त आकडेवारीत, उंचावलेल्या अन्नधान्याच्या किमती (हंगामी परिणामांपल्याड) तसेच तेलाच्या किमतीतील फेरउसळीने महागाई दरातील वाढ अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाची राहिली आहे. त्यामुळे तूर्त जैसे थे पवित्रा घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. डॉ. रघुराम राजन, गव्हर्नर रिझव्र्ह बँक रिझव्र्ह बँकेचा सद्य सावधानतेचा आणि नजीकच्या भविष्यात नरमाईचा पवित्रा पाहता, पाऊसपाण्याची स्थिती आणि आर्थिक सुधारणांच्या आघाडीवरील गती पाहून ऑगस्टमध्ये व्याजदर कपातीची अपेक्षा करता येईल. राणा कपूर, व्यवस्थापकीय संचालक, येस बँक रिझव्र्ह बँकेचे हे पतधोरण सरकारच्या अर्थवृद्धी आणि महागाई दराबाबत असलेल्या अपेक्षांशी सुसंगत आणि म्हणूनच स्वागतार्ह आहे. शक्तिकांत दास, केंद्रीय अर्थव्यवहार सचिव