५०,००० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे लक्ष्य

रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहातील  गृह वित्त  व्यवसायाला स्वतंत्र कंपनीत रूपांतरीत होऊन तीभांडवली बाजारात सूचिबद्ध होऊ घातली आहे. रिलायन्स कॅपिटलच्या अखत्यारीतील या कंपनीमार्फत रिलायन्स समूह गृह वित्त तसेच वित्त सेवा क्षेत्रात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने त्यासाठी येत्या काही वर्षांकरिता ५०,००० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे ध्येयही जाहीर केले आहे.

रिलायन्स कॅपिटलच्या अंतर्गत गृह वित्त (आरएचएफएल) व्यवसाय करणाऱ्या या कंपनीतील ५१ टक्के हिस्सा रिलायन्स समूहाचा असेल. तर सूचिबद्ध होणाऱ्या कंपनीतील ४९ टक्के हिस्सा रिलायन्स कॅपिटलला दिला जाणार आहे. रिलायन्स कॅपिटलच्या १० लाख भागधारकांना रिलायन्स गृह वित्त कंपनीचे समभाग मोफत मिळतील. म्हणजेच, रिलायन्स कॅपिटलमधील प्रत्येक एका समभागामागे रिलायन्स गृह वित्त कंपनीचा एक समभाग मिळेल.

याबाबतच्या प्रस्तावाला रिलायन्स कॅपिटलच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. कंपनीचे नवे संचालक जय अनमोल अनिल अंबानी हे या वेळी उपस्थित होते. नव्या गृह वित्त कंपनीमार्फत येत्या दीड वर्षांत २०,००० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. ते पुढील कालावधीत ५०,००० कोटी रुपयांवर जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत सर्वाना परवडणाऱ्या दरातील घरे देण्याचे स्वप्न रिलायन्स नव्या व्यवसाय पुनर्रचनेमुळे साध्य होईल, असा विश्वास अंबानी यांनी या वेळी व्यक्त केला. देशातील १० कोटी निवासी घरांची तूट भरून काढण्यासाठी कंपनीने निर्धारित केलेले कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूरक ठरेल, असेही ते म्हणाले.

८,२५९ कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या रिलायन्स गृह वित्त कंपनीच्या जून २०१६ अखेरच्या तिमाहीतील अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण अवघे एक टक्का आहे. विविध ५० शहरांमध्ये कंपनीचे सध्या २०,४०० ग्राहक आहेत.

रिलायन्स समूहातील रिलायन्स कॅपिटल ही वित्त सेवा क्षेत्रातील उपकंपनी आहे. तिच्या अखत्यारीत म्युच्युअल फंड, सर्वसाधारण विमा, दलाल पेढी, वित्तीय सेवा आदी उप व्यवसाय आहेत. रिलायन्स कॅपिटलपासून वाणिज्यिक वित्त विभाग विलग करण्यास भागधारकांनी सोमवारीच मंजुरी दिली होती.

यानुसार रिलायन्स वाणिज्यिक वित्त ही स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत लघू व मध्यम उद्योगांना कर्ज दिले जाणार आहे. कंपनीने जून २०१६ पर्यंत १६,४५१ कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन केले आहे. ही कंपनी रिलायन्स कॅपिटलची स्वतंत्र नवी उपकंपनी म्हणून कार्यरत राहिल.