चालू खात्यातील वाढत्या तुटीवरील दबाव कमी करण्यासाठी सरकारचे सुरू असलेले प्रयत्न आणि अर्थमंत्री चिदम्बरम यांनी अर्थव्यवस्थेच्या भल्यासाठी सोने-खरेदी टाळण्याचे केलेले जाहीर आवाहन यांना प्रतिसाद देत खासगी क्षेत्रातील वित्त कंपनी रिलायन्स कॅपिटलने स्वत:हून सोने विक्रीतून पूर्णपणे अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रिलायन्स कॅपिटलने तिच्या विविध शाखा, कार्यालयांमधून सोन्याची विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता कोणत्याही प्रकारचे ठोस सोने व्यवहार आता करणार नाही. अशाप्रकारे पाऊल उचलणारी ही पहिली खासगी कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे, याच रिलायन्सने ऐन सोन्याचे दर कमालीने कमी होत असताना, सरकारचेच एक अंग असलेल्या पोस्टामार्फत सुवर्ण-नाणी विक्रीत भागीदारी केली होती. यापुढे तीदेखील थांबविण्यात येत असल्याचे रिलायन्स कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम घोष यांनी आज जाहीर केले. अनिल धीरुभाई अंबानी समूहातील या कंपनीद्वारे २,२०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या सोन्याचे व्यवहार होतात. सोने मागणीसाठी सध्याचा कालावधीही आता तसा नरमच आहे.  त्यामुळे रिलायन्स कॅपिटलचा हा ताजा कित्ता अन्य कंपन्याही गिरविण्याची शक्यता आहे. आता तीन महिने सोन्याची आयात ७० टक्क्यांपर्यंत घसरेल, असा अंदाज आहे. सोन्याचे दरही आता तोळ्यासाठी २७ हजार रुपयांच्या आत विसावले आहेत.