scorecardresearch

‘रिलायन्स’ला तिमाहीत १६,२०३ कोटींचा नफा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी मार्चअखेर तिमाहीत २२.५ टक्क्यांच्या भरीव वाढीसह, १६,२०३ कोटी रुपयांच्या तिमाही नफ्याची नोंद करणारी आर्थिक कामगिरी जाहीर केली.

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी मार्चअखेर तिमाहीत २२.५ टक्क्यांच्या भरीव वाढीसह, १६,२०३ कोटी रुपयांच्या तिमाही नफ्याची नोंद करणारी आर्थिक कामगिरी जाहीर केली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने १३,२२७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या कयासापेक्षा कंपनीची तिमाहीतील कामगिरी मात्र खालावलेली दिसली.

देशातील या सर्वात मोठय़ा खासगी क्षेत्रातील कंपनीने तिमाहीतील एकत्रित महसूल २,११,८८७ कोटी रुपयांवर नेला आहे, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ३६.८ टक्क्यांनी वधारला आहे. तसेच सरलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ६७,८४५ कोटींच्या निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. याचबरोबर रिलायन्स समूहाने १०० अब्ज डॉलर म्हणजेच ७.९३ लाख कोटी महसुलाचा टप्पा गाठत नवीन विक्रम केला आहे. त्याचप्रमाणे किराणा व्यवसायाने (रिलायन्स रिटेल) देखील चांगली कामगिरी बजावत उच्चांकी ५८,०१९  कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे.

नफ्यात ‘जिओ’चे योगदान ३,७९५ कोटींचे

दूरसंचार व डिजिटल व्यवसाय एकवटलेल्या रिलायन्स जिओला सरलेल्या तिमाहीत ४,१७३ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात १५.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढत २०,९०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

रिलायन्सच्या नवीन अक्षय्य ऊर्जा व्यवसाय आणि नवीन तंत्रज्ञानाधारित व्यवसायातील कामगिरी उत्साहदायी आहे. आम्ही लवकरच जामनगरमध्ये ५,००० एकरमध्ये न्यू एनर्जी गीगा फॅक्टरी कॉम्प्लेक्स उभारणार आहोत.  

– मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reliance industries ltd percent full growth profit note financial performance announced ysh