आजवरचा विक्रमी असा ६,७२० कोटी रुपयांचा तिमाही निव्वळ नफा नोंदविणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे वित्तीय निकाल शुक्रवारी बाहेर आले. उल्लेखनीय म्हणजे रिफायनरी आणि पेट्रोरसायने या प्रमुख व्यवसाय क्षेत्राचे या निकालात भरीव योगदान असून, ही बाब या अंबानीप्रणीत उद्योगसाम्राज्यासाठी उत्साहवर्धक आहे. शुक्रवारी शेअर बाजारातील व्यवहार आटोपल्यावर हे निकाल आले असले, तरी येणाऱ्या आठवडय़ात मुख्यत: रिलायन्सचा समभाग आणि तेल व वायू उद्योगक्षेत्र निर्देशांक आणि पर्यायाने संपूर्ण बाजाराला ऊर्जा त्यामुळे मिळू शकेल, असा विश्लेषकांचा होरा आहे.

रिलायन्सचा सरलेल्या जुलै-सप्टेंबर २०१५ तिमाहीचा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत १२.५ टक्क्य़ांनी वाढून ६,७२० रु. अशा सार्वकालिक उच्चांकी स्तराला पोहचला आहे. परिणामी रिलायन्सची प्रति समभाग मिळकत यामुळे २२.८ रुपये होईल, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत २०.३ रुपये होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती घसरल्याने कंपनीचे विक्री उत्पन्न मात्र ३३.८ टक्क्य़ांनी घटून ७५,११७ कोटी रुपयांवर आले आहे.

येत्या डिसेंबरपासून रिलायन्स जिओकडून ४ जी मोबाईल सेवांचे होत असलेले अनावरण पाहता, कंपनीने त्यासंबंधाने मोबाईल हँडसेट्सची विक्री सुरू केल्याची घोषणा केली. कंपनीचे आणखी एक व्यवसाय अंग असलेल्या रिलायन्स रिटेलने तिमाही उलाढालीत प्रथमच ५००० कोटी रुपयांचा टप्पा गाठला.

रिफायनिंग व्यवसायातील वाढ ही खूप उत्साहदायी आहे. कच्च्या तेलाच्या किमत ऱ्हासाने मिळवून दिलेली संधी आणि उपलब्ध संसाधानांचा अत्युत्तम वापर यांच्या मिलाफातून हे घडले आहे.
’ मुकेश अंबानी , अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज