scorecardresearch

‘रिलायन्स’ला २०,५३९ कोटींचा विक्रमी तिमाही निव्वळ नफा

देशातील या सर्वात मोठय़ा खासगी क्षेत्रातील कंपनीने तिमाहीतील एकत्रित महसूल २,०९,८२३ कोटी रुपयांवर नेला आहे

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी डिसेंबरअखेर तिमाहीत ३७.९ टक्क्यांच्या भरीव वाढीसह, २०,५३९ कोटी रुपयांच्या विक्रमी तिमाही नफ्याची नोंद  करणारी आर्थिक कामगिरी जाहीर केली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने १३,१०१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या कयासापेक्षा कंपनीची तिमाहीतील कामगिरी ही प्रत्यक्षात अनेकांगांनी सरस ठरली आहे.

देशातील या सर्वात मोठय़ा खासगी क्षेत्रातील कंपनीने तिमाहीतील एकत्रित महसूल २,०९,८२३ कोटी रुपयांवर नेला आहे, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ५२.२ टक्क्यांनी वधारला आहे. उल्लेखनीय म्हणजे कंपनीचे प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) वार्षिक आधारावर ३८.१ टक्क्यांनी वधारून २८.१ रुपये प्रति समभाग झाले आहे. कंपनीला डिजिटल सेवांमधून (जिओ) मिळणाऱ्या महसुलात विक्रमी वाढ झाली असून तो २५,२०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे किराणा व्यवसायाने (रिलायन्स रिटेल) देखील चांगली कामगिरी बजावत उच्चांकी ५७,७१४ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळविला आहे.

जिओला ३,७९५ कोटींचा नफा

दूरसंचार व डिजिटल व्यवसाय एकवटलेल्या रिलायन्स जिओला सरलेल्या तिमाहीत ३,७९५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात ८.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.८ टक्क्यांनी वाढत २४,१७६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान ३१ डिसेंबर २०२१ रोजी जिओच्या ग्राहकांची संख्या ४२.१० कोटींवर पोहोचली आहे.

रिलायन्सने चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे, जी तिमाही निकालातून प्रतिबिंबित झाली आहे. आमच्या सर्व व्यवसायांनी पुन्हा एकदा विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे.

मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reliance industries q3 profit surges 38 percent to rs 20539 crore zws