दूरसंचार विभागाने मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम या कंपनीला ४जी सेवा सुरू करण्यासाठी दोन कोटी वीस लाख फोन क्रमांक देऊ केले आहेत. त्यामुळे आता रिलायन्स जिओची ४जी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कारण, संपूर्ण देशभरात ४जी सेवा पुरवण्याचा परवाना यापूर्वीच रिलायन्सला मिळाला आहे.
मुकेश अंबानी यांनी सुरू केलेली रिलायन्स इन्फोकॉम आता अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स कम्युनिकेशन म्हणून ओळखली जाते. आता मुकेश अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीच्या माध्यामातून ४जी सेवा उपलब्ध करून देणार आहेत. भारतात ज्या भागात रिलायन्सला ४जी सेवा पुरविण्यात स्वारस्य नसेल तिथे भारती एअरटेल ४जी सेवा पुरवणार आहे. रिलायन्स आणि भारती एअरटेल यांच्यात एकमेकांच्या पायाभूत सुविधा वापरण्याचा सामंजस्य करार झाल्यानंतर दूरसंचार विभागाने लगेच रिलायन्सला आपली सेवा सुरू करण्यासाठी दोन कोटींहून अधिक फोन क्रमांक जारी केले आहेत.