पीटीआय, नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने जुलै महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारित किरकोळ महागाई दराचा पाराही उतरला. आधीच्या मे आणि जूनमध्ये सात टक्क्यांपुढे कडाडलेला हा दर, सरलेल्या महिन्यांत ६.७१ टक्क्यांवर उतरल्याने या आघाडीवर येत्या काळात सर्वसामान्यांसह, धोरणकर्त्यांनाही दिलासा अनुभवता येण्याचे संकेत मिळत आहेत.

केंद्राच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील काही महिन्यांत दिसून आलेल्या चढत्या क्रमापासून फारकत घेत किरकोळ महागाई दर जुलै महिन्यात ६.७१ टक्क्यांपर्यंत खाली आला. या आधी जूनमध्ये किरकोळ महागाई दर ७.०१ टक्के, मे महिन्यांत ७.०४ टक्के, तर एप्रिल महिन्यांत ७.७९ टक्के नोंदविण्यात आला होता. गतवर्षी म्हणजे जुलै २०२१ मध्ये तो ५.५९ टक्के राहिला होता. यंदाच्या जुलै महिन्यात अन्नधान्य महागाई दरात एक टक्क्यांची घसरण झाली व जूनमधील ७.७५ टक्क्यांवरून कमी होत ६.७५ टक्क्यांवर आला आहे.

केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेसाठी महागाई दराचा हा उच्च स्तर डोकेदुखी बनला आहे. दोहोंकडून वाढत्या महागाईला लगाम लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने तर चालू आर्थिक वर्षांत रेपो दरात सलग तीनदा वाढ करून, बँकांकडून कर्ज घेणे महाग केले आहे. आता अन्नधान्य मुख्यत: भाज्या व डाळी आणि अन्य चीज वस्तूंच्या किमती उतरल्यामुळे देशातील किरकोळ महागाईच्या दरात सरलेल्या जुलै महिन्यात घट दिसून आली. असे असले तरी किरकोळ महागाई दर सलग सातव्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेसाठी सहनशील पातळीच्या तुलनेत अधिक राहिला आहे. चालू वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांत किरकोळ महागाई दर सात टक्क्यांच्या वर राहिला आहे. अर्थात तो वाढणार असे रिझव्‍‌र्ह बँकेचे कयासही होते व प्रत्यक्षात तिच्या तिमाहीसंबंधी पूर्वानुमानित दरापेक्षा तो निम्न पातळीवर राहिल्याचेही दिसले आहे.

अन्नधान्याच्या किमती ओसरल्याने जुलैमधील महागाई दरही ६.७ टक्क्यांपर्यंत खाली आला. मात्र देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना करूनही इंधन महागाईतील वाढ चिंताजनक बाब आहे. सध्या, जागतिक खनिज तेल आणि कमोडिटीच्या किमती नरमल्या आहेत, त्या परिणामी महागाईत आणखी उतार शक्य आहे. तथापि, ज्यामुळे आयात खर्च वाढतो ती रुपयातील घसरण आणि असमान मोसमी पाऊस व अतिवृष्टीमुळे पीक उत्पादन घसरण दिसल्यास, नजीकच्या काळात महागाईसंबंधाने जोखीम कायम राहील असे दिसते. 

– विवेक राठी, संचालक-संशोधन, नाइट फ्रँक इंडिया