महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या कंपनीने राज्यातील भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेता अनेक नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांची अंमलबजावणी, संचालन व सुव्यवस्था यावर होणाऱ्या खर्चात कपात करून प्रकल्पांना गती देण्यात महापारेषणला विविध सेवा व सामग्री पुरविणाऱ्या कंत्राटदारांची महत्त्वाची भूमिका असून, या कामी उभयतांमध्ये परस्पर संवाद आणि आदान-प्रदान म्हणून महापारेषणने आपल्या संकेतस्थळावर विशेष प्रतिसाद खिडकी सुरू केली आहे.
महापारेषणने अलीकडेच हॉटेल ट्रायडन्ट, बीकेसी येथे एका कार्यशाळेचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या खिडकीचे अनावरण करण्यात आले. या एकदिवसीय कार्यशाळेत देशभरातील जवळपास ७० विविध सेवा पुरवठादारांच्या २०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला. ऊर्जामंत्री बावनकुळे आणि महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार मित्तल आणि महापारेषणचे संचालक (प्रकल्प) रवींद्र चव्हाण यांनी याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. केवळ महापारेषण स्तरावरच नाही, तर महानिर्मिती आणि महावितरण स्तरावरदेखील त्वरित सूचना देऊन त्या सोडविण्याचे आश्वासन या प्रसंगी बावनकुळे यांनी दिले. राज्याच्या विकासास चालना देणाऱ्या ऊर्जाविषयक कामांना गती देण्यात कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, अशी शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.