स्टेट बँकेत सहयोगी बँकांचे विलीनीकरण; अहवाल जूनअखेपर्यंत अपेक्षित

राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेत तिच्या एका सहयोगी बँकेचे चालू आर्थिक वर्षांतच विलीनीकरण करण्याचा पुनरुच्चार बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी केला. याबाबत नेमलेल्या अभ्यासगटाचा अहवाल दुसऱ्या तिमाहीअखेर अपेक्षित असल्याने मार्च २०१४ नंतर पाचपैकी कोणत्याही एका सहयोगी बँकेचे मुख्य बँकेत विलीनीकरण होईल, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेत तिच्या एका सहयोगी बँकेचे चालू आर्थिक वर्षांतच विलीनीकरण करण्याचा पुनरुच्चार बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी केला. याबाबत नेमलेल्या अभ्यासगटाचा अहवाल दुसऱ्या तिमाहीअखेर अपेक्षित असल्याने मार्च २०१४ नंतर पाचपैकी कोणत्याही एका सहयोगी बँकेचे मुख्य बँकेत विलीनीकरण होईल, असेही त्यांनी सांगितले.
स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या अन्य एका सहयोगी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चौधरी यांनी हे वक्तव्य केले. बँकेच्या पाचपैकी एका सहयोगी बँकेचे मुख्य बँकेत चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत विलीनीकरण होईल, असे चौधरी यांनी यापूर्वीही स्पष्ट केले होते. मात्र नेमकी कोणती बँक समाविष्ट होईल हे सांगण्याचे त्यांनी या वेळीही टाळले.
याबाबतच्या विविध पर्यायांचा विचार करण्यासाठी अंतर्गत अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याचे केवळ त्यांनी सांगितले. त्याचा अहवाल जूनअखेपर्यंत अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. उभय बँकांमधील कर्मचारी वेतनाबाबत मतभेद असून कर्मचारी संघटनेबरोबर सुरू असलेल्या चर्चेतून त्यावर तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्टेट बँकेच्या स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पतियाळा व स्टेट बँक ऑफ हैदराबाद या पाच सहयोगी बँका असून स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंदूर या दोन बँकांचे यापूर्वीच मुख्य बँकेत विलीनीकरण झाले आहे. स्टेट बँकेच्या स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या तिन्ही सहयोगी बँका भांडवली बाजारात सूचिबद्ध आहेत.

..तर स्टेट बँक वैश्विक टॉप १० मध्ये!
भारतीय स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष ओ. पी. भट यांचा सर्व सहयोगी बँकांचे मुख्य बँकेत पाच वर्षांत विलीनीकरण करून एक जागतिक दर्जाची बँक निर्माण करण्याचे धोरण होते. त्यांच्या कारकिर्दीत दोन बँकांचे विलीनीकरण पूर्ण झालेही. मात्र मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे या धोरणास काहीशी खीळ बसली आहे. अर्थव्यवस्था सध्या रुळावर येत असल्यामुळे स्टेट बँक पुन्हा या निर्णयावर विचार करत असल्याचे दिसते. मुख्य स्टेट बँकेची मालमत्ता सध्या १३ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. ३ लाख कर्मचारी आणि १५,५०० शाखा असलेली स्टेट बँक तिच्या पाचही सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर बाजारमूल्याच्या निकषावर जगातील पहिल्या दहा बँकांच्या यादीत येईल. सध्या ती जागतिक स्तरावर पहिल्या ५० बँकांच्या पंक्तीत बसते.
* प्रतीक सुधीर जोशी, बाजार विश्लेषक
 
स्टेट बँक परिवार..
* स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर ’ स्टेट बँक ऑफ म्हैसूर ’ स्टेट बँक ऑफ त्रावणकोर        ’ स्टेट बँक ऑफ पतियाळा ’ स्टेट बँक ऑफ हैदराबाद अशा पाच सहयोगी बँका
* स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र ’ स्टेट बँक ऑफ इंदूर या दोन बँकांचे यापूर्वीच विलीनीकरण
* स्टेट बँक ऑफ बिकानेर व जयपूर ’ स्टेट बँक ऑफ म्हैसूर ’ स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या तीन बँका शेअर बाजारात सूचिबद्ध

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Report on merger bank partner of state bank of india expected at the end of june

ताज्या बातम्या