मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेच्या येत्या आठवडय़ात होणाऱ्या पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीवर लक्ष केंद्रित करत भांडवली खर्चात मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. त्यातून भविष्यात महागाई वाढण्याचा परिणाम दिसून आल्यास मात्र व्याजदर वाढीची शक्यता आहे, असा कयास आघाडीची विदेशी दलाली पेढी बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने शुक्रवारी व्यक्त केला.

येत्या सोमवारपासून रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीला सुरुवात होणार असून अर्थसंकल्पानंतर रोख्यांवरील परतावा दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच जागतिक पातळीवर महत्त्वाच्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर काही बँकांनी व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. देशात मे २०२० पासून मुख्य रेपो दर ४ टक्क्यांवर कायम आहे, जो आतापर्यंतचा त्यांचा नीचांकी स्तर आहे.

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हसह, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी करोनाकाळात सुरू केलेल्या अर्थ-प्रोत्साहक उपायांना गुंडाळण्याचे कार्यक्रम जाहीर केले आहेत. शिवाय फेडरल रिझव्‍‌र्हकडून जलदगतीने व्याजदर वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

 या उलट रिझव्‍‌र्ह बँकेकडून अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी पोषक दृष्टिकोन कायम ठेवून धिम्या गतीने व्याजदर वाढ केली जाणे अपेक्षित आहे. अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था वाढीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या पतधोरणात रेपो दर आहे त्या पातळीवर कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे, असा कयास बँक ऑफ अमेरिकाने व्यक्त केला.