भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या चलनविषयक समितीने बुधवारी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सलग नवव्यांदा रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेपो दर ४ टक्क्यांवर स्थिर आहे. चलनविषयक धोरण समितीच्या सहा सदस्यांपैकी पाच सदस्यांनी धोरण दर सध्याच्या पातळीवर ठेवण्यास पाठिंबा दिला होता. त्यामुळे तुमचा बँक एएमआय कमी होणार नाही. रेपो दरात कपात केल्यानंतर व्याजदर कमी करण्यासाठी बँकांवर दबाव येत आहे. बँकांनी व्याजदरात कपात केली तर ईएमआयही कमी होतो.

दास म्हणाले की, रिझर्व्ह बँक विकास दर पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि शाश्वत आधारावर कायम ठेवण्यासाठी उदारमतवादी भूमिका घेत राहील. आरबीआय बँकांना त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय नफा परत करून परदेशी शाखांमध्ये भांडवल घालण्याची परवानगी देईल. नोव्हेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या किमती नरमल्या, ज्यामुळे देशांतर्गत बाजारातील किंमतीवरील दबाव कमी होईल. त्याच वेळी, पेट्रोल, डिझेलच्या किमतींवरील कर दर कमी केल्याने उपभोगाच्या मागणीला मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत शक्तिकांत दास यांनी भाष्य केले भारतीय अर्थव्यवस्था सर्वात मोठ्या घसरणीतून बाहेर आली आहे. आपण कोविड-१९ महामारीचा सामना करण्यासाठी चांगल्या प्रकारे तयार आहोत. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था उघडत आहेत. की भारतीय अर्थव्यवस्था पुनर्प्राप्तीच्या मार्गावर असलेल्या इतर देशांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे पण जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींपासून दूर जाऊ शकत नाही, असे शक्तिकांत दास यांनी म्हटले.

शक्तीकांत दास म्हणाले की २०२१-२२ साठी वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अंदाज ९.५ टक्क्यांवर वर कायम ठेवण्यात आला आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज आधीच्या ६.८ टक्क्यांवरून ६.६ टक्के कमी केला आहे. यासोबतच, आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीसाठी जीडीपी अंदाज ६.१ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आला आहे.