मुंबई : महागाई नियंत्रणासाठी आणि घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी मध्यवर्ती बँकेने रेपो दरात अर्धा टक्का वाढीसह दाखविलेल्या निग्रहाचे भांडवली बाजारानेही स्वागत केले. परिणामी गुरुवारच्या विरामानंतर प्रमुख निर्देशांकांनी शुक्रवारच्या सत्रात पुन्हा सकारात्मक वळण घेतले. परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि आंतराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीतील घसरणीनेही बाजारातील व्यवहारांना गती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८९.१३ अंशांची भर पडली आणि तो ५८,३८७.९३ पातळीवर बंद झाला. दिवसभरात ३५०.३९ अंशांची उसळी घेत त्याने ५८,६४९.१९ असा उच्चांक स्तरही गाठला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५.५० अंशांची वाढ होऊन तो १७,३९७.५० पातळीवर विसावला.

रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात केलेली वाढ अपेक्षेपेक्षा अधिक असूनही भांडवली बाजारात त्याचे स्वागत झाले. जागतिक पातळीवर अन्नधान्य आणि पोलादाच्या किमती कमी झाल्या असल्या तरीही मध्यवर्ती बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी महागाई दराचे लक्ष्य ६.७ टक्क्यांवर कायम राखले आहे. जे अजूनही रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील पातळीपेक्षा अधिक आहे. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत महागाई दर ओसरण्याचा मध्यवर्ती बँकेने वर्तविलेला आशावाद बाजाराला सुखावणारा ठरला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

सेन्सेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, विप्रो आणि अ‍ॅक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडसइंड बँकेच्या समभागात घसरण नोंदवली गेली. गेल्या काही सत्रात खनिज तेलाचे दर पिंपामागे १०० डॉलरखाली आल्याने आयातदारांना किंचित दिलासा मिळाला आहे.

‘एफआयआय’कडून खरेदीला जोर

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भांडवली बाजारात विक्रीपेक्षा समभाग खरेदीला प्राधान्य दिले. परिणामी गेल्या काही दिवसांप्रमाणे गुरुवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी १,४७४.७७ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reserve bank welcomed market control inflation falling rupee ysh
First published on: 06-08-2022 at 01:18 IST