scorecardresearch

चढय़ा महागाईचे आव्हान ; महागाई दर सात टक्क्यांच्या वेशीवर

महागाई दराने चढता क्रम कायम राखत मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचत १७ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे

नवी दिल्ली : सर्व क्षेत्रांतील उत्पादनाला ग्रासलेल्या पुरवठा साखळीतील अडथळय़ांचा, त्याचप्रमाणे युद्धामुळे विस्कळीत झालेल्या जागतिक धान्य उत्पादनाने वाढलेल्या खाद्यतेल आणि खतांच्या किमती यांचे भयानक परिणाम मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने दाखवून दिले. किरकोळ किमतीवर महागाई दराने चढता क्रम कायम राखत मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचत १७ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे, तर फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन अवघ्या १.७ टक्क्यांनी विस्तारू शकला. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेला घसरत्या उत्पादनाचा आणि कडाडत चाललेल्या किमतीचा दुहेरी आघात सोसावा लागत आहे.

किरकोळ किमतीवर महागाई दर सलग तिसऱ्या महिन्यांत सहा टक्क्यांच्या पातळीवरून, पुढे सरकत मार्चमध्ये सात टक्क्यांच्या वेशीवर पोहोचला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित किरकोळ महागाई दर आधीच्या फेब्रुवारी महिन्यात ६.०७ टक्के होता. तर त्याआधीच्या जानेवारी महिन्यातही तो  रिझव्‍‌र्ह बँकेच्या दृष्टीने सहनशीलतेच्या वरच्या पातळीचा भंग करत ६.०१ टक्क्यांवर होता. मार्चमधील ६.९५ टक्क्यांची पातळी म्हणजे किरकोळ महागाई दरातील १७ महिन्यांच्या उच्चांक आहे, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. मुख्यत्वे अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती यामागे असल्याचे आकडे सांगतात.

मार्च २०२२ मध्ये अन्नधान्याच्या घटकांमधील महागाई दर ७.६८ टक्क्यांवर गेला आहे. आधीच्या महिन्यात ज्याचे प्रमाण ५.८५ टक्के होते. अन्नधान्याच्या किमतीचा किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकात ५० टक्के वाटा असून, त्या खालोखाल इंधनाच्या आभाळ गाठणाऱ्या किमतींनी महागाईत भर घातली आहे.

चालू वर्षांतील जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत किरकोळ महागाई दर सरासरी ६.४ टक्के पातळीवर आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सरलेल्या शुक्रवारी या संबंधाने भाष्य करताना, आर्थिक वर्षांतील महागाई दरासंबंधीचे अनुमानही ४.५ टक्क्यांवरून वाढवून ते ५.७ टक्क्यांवर नेत असल्याचे स्पष्ट केले. तर एप्रिल-जून तिमाहीमध्ये सरासरी किरकोळ महागाई दर ६.३ टक्के राहण्याचा कयासही दास यांनी व्यक्त केला. हे पाहता येत्या काही महिन्यांत महागाई दराची चढती भाजणी सुरू राहण्याची शक्यता दिसून येते. म्हणूनच मागील दोन वर्षे अर्थव्यवस्थेच्या विकासाला पतधोरणाचा प्राधान्यक्रम यापुढे महागाई नियंत्रणाला राहील, असा भूमिका बदल रिझव्‍‌र्ह बँकेने केला आहे. 

फेब्रुवारीमध्ये औद्योगिक उत्पादन दर १.७ टक्क्यांवर

देशाच्या औद्योगिक उत्पादनातील वाढ सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात १.७ टक्क्यांनी विस्तारली आहे, अशी माहिती मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, उत्पादन दरात महिनागणिक वाढ दिसून येत असली तरी ही वाढ अत्यंत नाममात्र आहे. मुख्यत्वे खाण उत्पादन आणि वीजनिर्मिती क्षेत्रातील कामगिरीमुळे यंदा एकूण औद्योगिक उत्पादनात निर्देशांकात (आयआयपी) वाढ नोंदविली गेली आहे. फेब्रुवारीमध्ये निर्मिती क्षेत्राचे उत्पादन अवघ्या ०.८ टक्क्यांनी वधारले आहे.  मागील वर्षांत म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये औद्योगिक उत्पादनात निर्देशांकात ३.२ टक्क्यांनी घसरण दिसली होती. आर्थिक वर्षांत एप्रिल ते फेब्रुवारी २०२१-२२ दरम्यान, हा निर्देशांक १२.५ टक्क्यांनी विस्ताराला आहे. जो गेल्या वर्षी याच कालावधीत करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तसेच टाळेबंदीच्या विपरीत प्रभावामुळे ११.१ टक्क्यांपर्यंत आक्रसला होते. सरलेल्या ११ महिन्यांच्या कालावधीत, निमिर्ती क्षेत्राने १२.९ टक्के वाढ नोंदवली आहे, तर वर्षभरापूर्वीच्या कालावधीत ती १२.५ टक्क्यांनी घसरणीत होती.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Retail inflation rises to 6 95 percent in march zws