वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे. सेंट्रल बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर १० जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. तर  इंडियन ओव्हरसीज बँकेने  दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, नवीन व्याजदर वाढ १२ जुलै २०२२ पासून लागू झाली आहे.

सेंट्रल बॅंकेच्या ४६-९० दिवसांची मुदतपूर्ती असलेल्या ठेवींवरील व्याजदर ३.२५ टक्क्यांवरून ३.३५ टक्के करण्यात आला आहे, तर ३१ ते ४५ दिवसांच्या ठेवींवर व्याजदर २.९० टक्क्यांवरून ३.०० टक्के करण्यात आला आहे. याचबरोबर १८० ते ३६४ दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर आता ४.३५ टक्क्यांवरून ४.४० टक्के व्याज मिळेल. तसेच १ वर्ष आणि २ वर्षांपेक्षा कमी मुदत ठेवींवर ५.२५ टक्के व्याज मिळणार आहे. २ ते ३ वर्षे मुदतपूर्ती असलेल्या ठेवींवर ५.३० टक्के आणि ३ ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ५.३५ टक्के व्याज मिळेल. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या दोन कोटींपेक्षा कमी रकमेच्या दीर्घ कालावधीच्या ठेवींवर ५.४५ ते ५.६० टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.