ऑक्टोबरमध्येही दर चिंताजनक ७.६१ टक्क्यांवर

नवी दिल्ली : टाळेबंदीत शिथिलतेनंतरही अन्नधान्याच्या किमतीतील वाढ दुहेरी अंकात राहिल्याचा फटका एकूण महागाई दराला बसला आहे. किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक ऑक्टोबरमध्ये ७.६१ टक्क्य़ांवर झेपावला आहे. अन्नधान्याच्या किमतीतील ११ टक्क्य़ांपर्यंत भडक्याने महागाई दर सात टक्क्य़ांपुढे  राहिला आहे.

आधीच्या महिन्यात, सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई निर्देशांक ७.२७ टक्के होता. सलग दुसऱ्या महिन्यात महागाई दर चिंताजनक सात टक्क्य़ांपुढे, तर रिझव्‍‌र्ह बँकेच्या ४ टक्के (अधिक, उणे २ टक्के) या सहनशील टप्प्यापुढे तो सलग सातव्या महिन्यात कायम आहे. आर्थिक विकासापेक्षा महागाई नियंत्रणावर लक्ष केंद्रित करून रिझव्‍‌र्ह बँकेने सलग दुसऱ्या पतधोरण बैठकीत व्याजदर कपात टाळली आहे. चालू वित्त वर्षांत विकास दर उणे स्थितीत राहण्याची शक्यता सर्वच विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

वर्षभरापूर्वी, ऑक्टोबर २०१९ मध्ये महागाई दर ४.६२ टक्के होता. यंदा अन्नधान्याचा किंमत निर्देशांक ११.०७ टक्के नोंदला गेला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये तो १०.६८ टक्के होता.

मुख्यत्वे नाशिवंत पदार्थाच्या वाढत्या किमतीमुळे एकूण महागाई दर वाढत आहे. काही भागात अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे नाशिवंत पदार्थाच्या किमती वाढत आहेत. अन्नधान्य किमती नियंत्रणात राखण्यासाठी सरकार अल्प तसेच मध्यम कालावधीतील उपाय राबवत आहे. नाशवंत जिनसांची दीर्घ काळ तसेच सर्व प्रकारच्या हवामानात साठवणूक होऊ शकेल, असे प्रयत्न आहेत.

’ अर्थमंत्री निर्मला सीतारामन

(महागाई निर्देशांक जाहीर होण्यापूर्वी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना)