scorecardresearch

रुपयाचा ऐतिहासिक नीचांक; प्रति डॉलर पहिल्यांदाच ७७.५० पातळीवर घसरण

आंतरबँक परकीय चलन बाजारात सोमवारच्या सत्रात रुपयाने ७७.१७ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली.

मुंबई : देश-विदेशातील प्रतिकूल घटनांच्या एकत्रित परिणामाने सोमवारी रुपयाच्या विनिमय मूल्याचे तीव्र नुकसान केले. प्रति डॉलर आणखी ६० पैशांच्या घसरगुंडीसह रुपयाचे मूल्य इतिहासात प्रथमच ७७.५० या पातळीवर गडगडले.

युरोपातील साधारण अपेक्षेपेक्षा लांबलेले युद्ध, अमेरिकी मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर वाढीबाबत आक्रमकता आणि चीनमधील करोना टाळेबंदी आणि तिचे मंदीसदृश आर्थिक परिणाम, तर यात भर म्हणून विदेशी गुंतवणूकदारांचे अखंडपणे सुरू असलेले देशाबाहेर पलायन या घटकांनी रुपयाला उत्तरोत्तर कमकुवत बनविले आहे. खनिज तेलाच्या भडकलेल्या आंतरराष्ट्रीय किमती आणि तेलाच्या आयातीसाठी देशातून वाढलेल्या डॉलरच्या मागणीनेही चलनाच्या घसरगुंडीस हातभार लावला. परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, महागाईतील भडका, त्या परिणामी व्याजदरातील आक्रमक वाढ यातून अर्थव्यवस्थाच मंदावण्याची चिंता वाढली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी जोखीमदक्ष बनत मायदेशात सुरक्षित पर्यायांकडे वळण घेण्यातून हेच दिसून येते. त्यांच्या या निर्गुतवणुकीतून स्थानिक चलनात मूल्यऱ्हास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरबँक परकीय चलन बाजारात सोमवारच्या सत्रात रुपयाने ७७.१७ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. अखेर ६० पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ७७.५० या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले. सत्रादरम्यान ते ७७.५२ पातळीपर्यंत गडगडले होते.

या आधी शुक्रवारच्या सत्रातही रुपया डॉलरमागे ५५ पैशांनी कोसळून ७६.९० वर बंद झाला होता. म्हणजेच सलग दोन दिवसांतील घसरणीने रुपयाचे प्रति डॉलर विनिमय मूल्य ११५ पैशांनी क्षीण झाले आहे.

खनिज तेलाच्या तापलेल्या किमती आणि त्यातून देशांतर्गत बसणारे महागाईचे तडाखे यावर नियंत्रण म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर वाढ ही अपेक्षेपेक्षा जलद गतीने होईल. यातून आधीच स्थानिक बाजाराकडे पाठ केलेल्या विेदेशी गुंतवणूकदारांच्या निर्गुतवणूक व विक्रीला गती मिळू शकते, जी रुपयासाठी अपायकारक ठरेल. दुसरीकडे रिझव्‍‌र्ह बँकेने 4 मे रोजी उरकलेल्या तातडीच्या बैठकीतून रुपयाच्या मजबूतीसाठी फारसे काही केले नाही. हे पाहता बाजारातील नकारात्मक भावना रुपयाला आणखी कमजोर बनवण्याचीच शक्यता दिसून येते.

रॉयस वर्गीस जोसेफ, विश्लेषक (चलन, ऊर्जा), आनंद राठी स्टॉक ब्रोकर्स

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rupee closes at all time low of 77 50 against us dollar zws