वाढत्या महागाईविषयी भांडवली बाजाराने मोठय़ा प्रमाणात चिंता व्यक्त केली नसली तरी परकीय चलन व्यासपीठावर त्याचे परिणाम बुधवारी जाणवले. डॉलरच्या तुलनेत रुपया एकाच व्यवहारात तब्बल १३ पैशांनी घसरत ६१.२१ पर्यंत घसरला. स्थानिक चलनाची आठवडय़ातील सर्वात मोठी आपटी बुधवारी नोंदविली गेली. रुपया मंगळवारी ०.१५ टक्क्यांच्या वाढीसह ६१.०८ वर होता. बुधवारची त्याची सुरुवात ६१.२९ या मोठय़ा घसरणीनेच झाली. सत्रात तो ६१.३० पर्यंत घसरला, तर व्यवहारातील त्याचा वरचा स्तर ६१.२१ हा राहिला. बुधवारची १३ पैसे ही एकाच व्यवहारातील रुपयाची आपटी ही ६ ऑगस्टनंतरची सर्वात मोठी ठरली. या दिवशी रुपया ६५ पैशांनी रोडावला होता. आगामी कालावधीत चलनाचा प्रवास ६०.८० ते ६१.८० दरम्यान असेल, असे मत व्हेरासिटी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट यांनी व्यक्त केले आहे. बुधवारच्या चलनाच्या प्रवासाबाबत, इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायजर्सचे संस्थापक अभिषेक गोयंका यांनी, जुलैमधील अपेक्षेपेक्षा अधिक महागाई दर आणि जूनमध्ये घसरलेल्या औद्योगिक उत्पादनाने परकी चलन व्यवहारातील गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरली.