scorecardresearch

रुपया आणखी छोटा; सार्वकालिक नीचांक; अर्थव्यवस्थेपुढे चिंता

भारताचे चलन अर्थात रुपयाच्या विनिमय मूल्यात तीव्र स्वरूपाच्या घसरणीचा क्रम सुरूच असून, बुधवारी प्रति डॉलर रुपया आणखी १६ पैशांनी घसरला.

मुंबई : भारताचे चलन अर्थात रुपयाच्या विनिमय मूल्यात तीव्र स्वरूपाच्या घसरणीचा क्रम सुरूच असून, बुधवारी प्रति डॉलर रुपया आणखी १६ पैशांनी घसरला. इतिहासात प्रथमच रुपया ७७.६० पातळीवर गडगडला. भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची अखंडपणे सुरू असलेल्या विक्री आणि निर्गुतवणुकीसह, आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरने कमावलेल्या बळकटीने रुपयाचे मूल्य उत्तरोत्तर नवीन तळ गाठताना दिसत आहे.

अर्थव्यवस्थेच्या पायालाच हादरे देणाऱ्या चलनवाढीला आटोक्यात ठेवण्यासाठी ‘फेड’कडून गरज पडेल तितक्यांदा व्याजाचे दर वाढविले जातील, अशा निग्रहाचा अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी पुनरूच्चार केला. ब्रिटनमधील चलनवाढीचा दरही ४० वर्षांतील कळस गाठणारा असून, तेथील मध्यवर्ती बँकेने आर्थिक मंदीची भीती व्यक्त करताना, व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार जोखमीबाबत अतिदक्ष बनला असून, डॉलरसंलग्न मालमत्तांतील गुंतवणुकीकडे वाढलेल्या आकर्षणाने डॉलरचे मूल्य अधिकाधिक वाढत आहे. बरोबरीने देशांतर्गत भांडवली बाजारात मुख्यत: परदेशी गुंतवणूकदारांनी नफावसुलीसाठी केलेली विक्री ही रुपयाच्या मूल्याला मारक ठरल्याचे विश्लेषकांनी सांगितले.   

अर्थसमस्या कोणत्या?

  • प्रति पिंप ११३ डॉलपर्यंत खनिज तेलाच्या तापलेल्या किमतीत रुपयाच्या घसरणीची भर पडून आयात खर्चात वाढ अपरिहार्य.
  • लांबलेल्या युक्रेन युद्धामुळे, खाद्यतेल, खते आणि अन्य आवश्यक जिनसांचा तुटवडा आणि आयात महागण्याच्या थेट परिणामाने अन्नधान्य किमतीचा आगडोंब. 
  • घाऊक किमतीवर आधारीत देशातील महागाई दराचे एप्रिलमध्ये १५ टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे १७ वर्षांतील उच्चांकपद गेले.
  • रिझव्‍‌र्ह बँकेसाठी संवेदनशील असलेला किरकोळ महागाई दरही एप्रिलमध्ये ७.७९ टक्क्यांच्या कळसाला पोहोचला.
  • महागाईतील भडका, त्या परिणामी व्याजदरातील आक्रमक वाढ यातून अर्थव्यवस्थाच मंदावण्याची चिंता.

झाले काय?

आंतरबँक परकीय चलन बाजारात बुधवारच्या सत्रात रुपयाने ७७.५७ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस १६ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ७७.६० या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले. सत्रादरम्यान ते ७७.६१ पातळीपर्यंत गडगडले होते.

नेमके कारण?

अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी तेथील अर्थव्यवस्थेविषयी केलेल्या टिप्पणीने अन्य प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरची मजबुती आणि खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील एक टक्क्याच्या फेरउसळीने रुपयाच्या मूल्यातील ताज्या पतनास हातभार लावला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rupee even smaller perpetual lows anxiety ahead economy ysh