scorecardresearch

रुपयात विक्रमी मूल्य-झड : डॉलरमागे ८०.९५ चा ऐतिहासिक नीचांक

आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपयाने ८०.२७ या सार्वकालिक नीचांकापासूनच गुरुवारी व्यवहारास सुरुवात केली.

रुपयात विक्रमी मूल्य-झड : डॉलरमागे ८०.९५ चा ऐतिहासिक नीचांक
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरात थेट पाऊण टक्क्यांची वाढ केल्यांनतर डॉलरच्या तुलनेत भारताचे चलन अर्थात रुपया ९० पैशांची गटांगळी घेत ८०.८६ या सार्वकालिक नीचांकी पातळीला गुरुवारी जाऊन पोहोचला. आगामी काळातही अमेरिकेत महागाईला पायबंद म्हणून आक्रमक दरवाढ होण्याचे संकेत असल्याने रुपयातील मूल्य-झडीबाबत आणखी विस्तारण्याची चिंता निर्माण झाली आहे.

आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपयाने ८०.२७ या सार्वकालिक नीचांकापासूनच गुरुवारी व्यवहारास सुरुवात केली. त्यांनतर दिवसभरातील सत्रात रुपयातील घसरण  वाढत गेली आणि त्याने ८०.९५ या आणखी खालच्या पातळीपर्यंत गटांगळी घेतली. दिवसअखेर बुधवारच्या तुलनेत ८३ पैशांच्या घसरणीसह तो प्रति डॉलर ८०.७९ पातळीवर स्थिरावला. भांडवली बाजारातील सेन्सेक्समधील सहस्रांशाच्या घरातील पडझडीने रुपयातील घसरण अधिकच वाढविली.

अमेरिकेत महागाई दर ४० वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी, शून्यवत असलेला तेथील व्याजदरात चालू वर्षांत वाढीचा प्रवास  सुरू होत तो आता ३ ते ३.२५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मध्यवर्ती बँकेकडून बुधवारी सलग तिसऱ्यांदा आक्रमकपणे व्याजदर वाढ करण्यात आली आहे. फेडचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी पत्रकार परिषदेत, महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आक्रमक दरवाढ कायम ठेवण्याचे संकेत दिले. अमेरिकेत गेल्या महिन्यात महागाईचा पारा ८.३ टक्के असा किंचित उतरला असला तरी तो अपेक्षेपेक्षा जास्त राहिल्याने बँकेने दरवाढीची कास फेडने कायम राखली. महागाई कमी करण्यासाठी २०२३ पर्यंत व्याजदर ४.६ टक्क्यांपर्यंत वाढविले जातील असे कयासही वर्तविण्यात येत आहेत.

येनची तटबंदी

 डॉलरच्या तुलनेत येनची घसरण रोखण्यासाठी जपानच्या मध्यवर्ती बँकेने गुरुवारी चलन बाजारात हस्तक्षेप करण्याचे असामान्य पाऊल टाकले. डॉलरचे मूल्य हे १४२ येनपर्यंत गडगडले. बुधवारच्या व्यवहारात मात्र, डॉलरचे मूल्यात १४६ येनने वाढ झाली, जो जपानच्या चलनाचा २४ वर्षांतील नीचांक आहे. फेडच्या व्याजदर वाढीच्या निर्णयानंतर बँक ऑफ जपानने तेथील प्रमुख कर्जदर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला जे येनच्या पथ्यावर पडले. फेडच्या व्याजदर वाढीनंतर डॉलर निर्देशांक ०.८८ टक्क्यांनी वाढून १११.६१ पातळीवर पोहोचला आहे. त्या परिणामी युरोपीय महासंघाचे चलन युरो हे डॉलरच्या तुलनेत ०.९८२२ असे वीस वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे आणि तर पौंड १.१३०४० या पातळीवर म्हणजे ३७ वर्षांतील नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे.

८२ पर्यंत घसरगुंडी शक्य?

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर स्थिर व्हावे हे निश्चित केलेले नसले तरी डॉलरच्या तुलनेत त्यात मोठी पडझड होऊ न देण्यावर रिझव्‍‌र्ह बँकेचा भर राहिला आहे. रुपयाला पुन्हा सावरण्याचे प्रयत्न म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेकडून चालू वर्षांत आतापर्यंत ४० अब्ज डॉलरहून अधिक परकीय गंगाजळी खर्ची घातली आहे. मात्र तरीही डॉलरच्या तुलनेत रुपयाची नीचांकी घसरण कायम आहे. तथापि पुढील वादळी संकट पाहता, गुरुवारच्या व्यवहारात रुपयाच्या ८० पल्याड घसरणीला मध्यवर्ती बँकेने जमेस धरल्याचे दिसून येते, असे क्वांटआर्ट मार्केट सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक समीर लोढा यांनी नमूद केले. एकदा ८० च्या पुढे रुपयाला सातत्यपूर्ण आधारावर व्यवहार सुरू राहण्याची आणि वाढती व्यापार तूट आणि जागतिक मंदीच्या सावटातून विदेशातून ओघ आटल्याने पुढील दोन महिन्यांत रुपया ८२ ची वेसही गाठण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

फेडचे प्रमुख जेरॉम पॉवेल यांच्या कठोर भाष्यानंतर, रुपयातील पडझड आणखी वाढण्याचे संकेत आहेत. ती रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून हस्तक्षेप महत्त्वपूर्ण राहील आणि तसा तो गुरुवारी दिवसभरात झाल्याची अपेक्षा आहे. तथापि, तरीही रुपयाच्या ८० पल्याड घसरणीला तूर्त मुभा दिली जाईल, असे दिसून येते. 

– अनिल भन्साळी, फिनरेक्स ट्रेझरी अ‍ॅडव्हायझर्स

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rupee falls to record low 80 95 against dollar zws

ताज्या बातम्या