मुंबई : भारताचे चलन अर्थात रुपयाच्या विनिमय मूल्यात तीव्र स्वरूपाच्या घसरणीचा क्रम सुरूच असून, गुरुवारी प्रति डॉलर रुपया आणखी ९ पैशांनी घसरला. इतिहासात प्रथमच रुपया ७९.९० पातळीवर गडगडला आणि सलग चौथ्या दिवशी त्याने नवीन नीचांकाला कलंडण्याची मालिका कायम ठेवली आहे.

भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी अखंडपणे सुरू असलेल्या समभाग विक्रीआणि निर्गुतवणूक आणि  आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरने कमावलेल्या बळकटीने रुपयाचे मूल्य उत्तरोत्तर नवीन तळ गाठताना दिसत आहे.

आंतरबँक परकीय चलन बाजारात गुरुवारच्या सत्रात  रुपयाने ७९.७२ या पातळीपासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेरीस ९ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ७९.९० या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले. सत्रादरम्यान रुपयाने ७९.७१ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. तर सत्रादरम्यान ते ७९.९२ पातळीपर्यंत गडगडले होते.