scorecardresearch

ब्रेंट क्रूड ११८ डॉलरपुढे; नऊ वर्षांचा उच्चांक

भारताकडून होणारी तेल आयात ज्या आंतरराष्ट्रीय दराला आधार मानून होते, त्या ब्रेंट क्रूड तेलाच्या दराने गुरुवारी पिंपामागे ११८ डॉलरची पातळी ओलांडली आहे.

ब्रेंट क्रूड ११८ डॉलरपुढे; नऊ वर्षांचा उच्चांक

ब्रेंट क्रूड ११८ डॉलरपुढे; नऊ वर्षांचा उच्चांक

रशिया – युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धाबाबत अद्याप कोणताही तोडगा पुढे येत नसल्याने जागतिक पातळीवर इंधन दराचा भडका उडाला आहे. अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर निर्बंध लादल्याने व्यापार व्यत्यय आणि खनिज तेलाच्या वाहतुकीमधील आव्हानांमुळे पुरवठय़ाच्या बाजूने चिंता वाढली आहे आणि तेलभडक्याचे हेच प्रमुख कारण आहे. 

भारताकडून होणारी तेल आयात ज्या आंतरराष्ट्रीय दराला आधार मानून होते, त्या ब्रेंट क्रूड तेलाच्या दराने गुरुवारी पिंपामागे ११८ डॉलरची पातळी ओलांडली आहे. मागील नऊ वर्षांतील हा उच्चांकी दर असून याआधी ऑगस्ट २०१३ मध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ११६.६० डॉलर इतका होता. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत स्थिरता आणण्यासाठी अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांसोबत खनिज तेलाच्या धोरणात्मक साठय़ातून सुमारे ६ कोटी पिंप तेल उपलब्ध करून दिल्याने अमेरिकी तेलाचा साठा बहु-वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अपुऱ्या पुरवठय़ामुळे अमेरिकेतील तेल साठा कमी होत राहिल्यास इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कुशिंग, ओक्लाहोमा ऑइल हब येथील इंधनाच्या टाक्यांमधील साठा २०१८ पासून त्यांच्या सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे, तर अमेरिकेतील धोरणात्मक साठा सुमारे २० वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.

तेल निर्यातदार राष्ट्रांची संघटना, मित्र राष्ट्रांच्या नेत्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत बदललेल्या परिस्थितीत तेलाचा पुरवठा वाढू शकेल यासाठी उत्पादनांत वाढ करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. रशियाच्या समावेशासह बनलेल्या ‘ओपेक प्लस’कडून लवकरच प्रति दिन तेल उत्पादन चार लाख पिंपांनी वाढविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हा वाढीव पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारात आल्यास किमती नियंत्रणात येणे अपेक्षित आहे. 

अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी निर्बंध लादले आहेत. मात्र जागतिक पातळीवर रशियाकडून होणाऱ्या तेल आणि वायू निर्यातीवर अद्याप निर्बंध लादलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या मते, रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक आणि जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा निर्यातदार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2022 at 00:14 IST

संबंधित बातम्या